सीसीटीव्ही निविदेवर राज्यपालांची नजर

माजी महापौर जयवंत सूतार यांनी केली राज्यपालांकडे तक्रार

नवी मुंबई ः 1400 सीसीटीव्ही कॅमेरे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बसवण्याची 154 कोटींची निविदा वादात सापडली आहे. माजी महापौर जयवंत सूतार यांनी निविदेच्या वाढीव खर्चाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली आहे. आ. गणेश नाईक यांनीही याबाबत आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितल्याने पालिका अधिकार्‍यांची पाचावर धारण बसली आहे. आयुक्त या निविदा प्रक्रियेबाबत कोणता निर्णय घेतात याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 

नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीला आळा बसणे आणि वाहन चालकांना वळण लागावे म्हणून 80 स्पीड कंट्रोल कॅमेरांसह 1400 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात लावण्याचे योजिले आहे. त्यासाठी मागील सर्वसाधारण सभेने 154 कोटींची प्रशासकीय मंजुरी या कामासाठी दिली होती. महापालिकेने मागवलेल्या निविदेला 271 कोटींचा आर्थिक देकार आला असून संबंधित निविदा मंजुर करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यावर मंत्रालयातून दबाव आला असल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करुन नवीन प्रशासकीय मंजुरी घेऊन नव्याने निविदा मागवावी अशी सूचना अभियांत्रिकी विभागाने केल्याचे सूत्रांकडून कळते. 

अचानक वाढलेल्या या खर्चाची दखल तत्कालीन महापौर जयवंत सूतार यांनी घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे या निविदा प्रक्रियेबाबत तक्रार केली आहे. पालिका  आयुक्तांनी निविदा प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी नवीन समिती स्थापन केली आहे. परंतु ही समिती वाढीव खर्चाचे समर्थन करण्यासाठी केली असल्याचा आरोप करुन विशिष्ट ठेकेदाराला नजरेसमोर ठेवून ही निविदा प्रक्रिया राबविल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. या निविदा प्रक्रियेबाबत आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पुन्हा एकदा ही निविदा प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आ.गणेश नाईक विधानसभेत आवाज उठविणार
आयुक्त बांगर यांनी राबविलेल्या  निविदा प्रक्रियेबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ.गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यांच्या या भुमिकेमुळे पुन्हा सीसीटीव्हीची निविदा प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.