आश्रमातील ज्येष्ठांसाठी विशेष लसीकरण

नवी मुंबई ः पालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरणाला गती दिली जात आहे. यामध्ये चालता फिरता येऊ न शकणार्‍या व बेडवर असणार्‍या वृध्द, आजारी व्यक्तींना कोव्हीड संरक्षित करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात येते आहे. पालिका क्षेत्रातील प्रेमदान आश्रम, नर्मदा निकेतन, विश्रामधाम आणि पारिजात आश्रमातील वृद्धांना यात लसीकरण करण्यात आले. 

ऐरोलीतील प्रेमदान आश्रमामध्ये निराधार, दिव्यांग, वृध्द महिलांना करण्यात आलेल्या लसीकरणाप्रमाणेच सेक्टर 8, सी.बी.डी. बेलापूर येथील नर्मदा निकेतन, विश्रामधाम आणि पारिजात आश्रमातील वृध्द, बेडवर असणार्‍या व्यक्तींसाठी विशेष लसीकरण सत्राचे शासन निर्देशानुसार आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 30 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यातील प्रत्येक लाभार्थ्याची शासकीय कोवीन पोर्टलवर रितसर नोंदणी करण्यात आली.

1984 पासून सीबीडी बेलापूर परिसरात आजारी व निराधार व्यक्तींची काळजी घेणारी संस्था म्हणून नर्मदा निकेतन ओळखली जाते. ज्या ज्येष्ठांच्या घरी सांभाळायला कोणी नाही अशा ज्येष्ठांची याठिकाणी काळजी घेतली जाते. त्यामुळे मानवतेचा दृष्टीकोन जपत येथील ज्येष्ठ व बेडवर असलेल्या नागरिकांचे कोव्हीड लसीकरण करण्यात आले. या विशेष लसीकरण सत्रामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळालेला आहे.