तरुणींना फसवणार्‍या हॅकरला अटक

नवी मुंबई : विवाह इच्छुक तरुणींना मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्क साधून त्यांना लुटणार्‍या 32 वर्षीय हॅकरला एपीएमसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याने आजवर अनेक तरुणींची फसवणूक केली असून काहींवर अत्याचार देखील केले आहेत. मागील चार महिन्यांपासून त्याच्या मागावर असलेल्या नवी मुंबई पोलीसांना तो चकमा देत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. 

महेश उर्फ करण मनोज गुप्ता (32) असे एपीएमसी पोलीसांनी अटक केलेल्या हॅकरचे नाव आहे. तो मालाडला राहणारा असून त्याने मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले आहे. काही काळ त्याने हॅकर म्हणून देखील काम केलेले आहे. यामुळे संगणकीय तंत्रज्ञानाच्या असलेल्या ज्ञानाचा तो दुरुपयोग करून तरुणींना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत होता. यासाठी तो वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईटवर बनावट अकाउंटद्वारे विवाह इच्छुक मुलींचा शोध घ्यायचा. संबंधित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे. त्याठिकाणी स्वतःचे पॉकेट घरी राहिल्याचे किंवा इतर कारने सांगून संपूर्ण खर्च त्या तरुणीला करायला लावायचा. शिवाय काहींचे मोबाईल व पैसे देखील घेऊन पळ काढायचा. 12 पेक्षा जास्त महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे देखील समजते. अशाच प्रकारे तो जानेवारी महिन्यात एका तरुणीला घेऊन एपीएमसी आवारात आला होता. त्याने त्या तरुणीसोबत लगड करण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिकार करून त्याच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार केली होती. परंतु घटनेनंतर काही वेळातच त्याचा फोन कायमस्वरूपी बंद झाला होता. यामुळे गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक विकास रामुगडे यांनी निरीक्षक बशीद अली सय्यद, उपनिरीक्षक पंकज महाजन, पोलीस नाईक सुधीर कदम, अमोल भोसले आदींचे पथक केले होते. तपासादरम्यान गुप्ता हा प्रत्येक वेळी मोबाईल नंबर व मोबाईल बदलत असल्याचे समोर आले. प्रत्येक वेळी तो बनावट कागदपत्राद्वारे घेतलेले सिमकार्ड वापरत होता. यामुळे त्याच्या शोधासाठी पोलीसांनी देखील काही हॅकर्सची मदत घ्यावी लागली. अखेर शनिवारी मालाड परिसरातून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अनेक मुलींची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. अशा तरुणींनी संपर्क साधण्याचे आवाहन एपीएमसी पोलीसांनी केले आहे.