सिडको वसाहतीमधून मालमत्ताकर वसुली सुरू

पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर नोटिसा ; 10 हजार मालमत्ताधारकांनी केला 20 कोटींचा ऑनलाइन भरणा

पनवेल : सिडको वसाहतींतून मात्र थकीत मालमत्ताकरास विरोध कायम आहे. तीव्र विरोधानंतरही महापालिका प्रशासनाने प्रस्तावित मालमत्ताकर धोरणात बदल करीत ही कर वसुली सुरू केली आहे. पालिकेने संकेतस्थळावर नोटिसा जाहीर केल्या असून आतापर्यंत 10 हजार मालमत्ताधारकांनी 20 कोटींचा ऑनलाइन भरणा केला आहे. अडीच लाख मालमत्ताधारकांकडून 500 कोटींचा कर मिळणे अपेक्षित आहे. 

पालिकेचे सध्या जुन्या पनवेल नगर परिषदेच्या क्षेत्रात 40 हजार आणि ग्रामीण पनवेलमध्ये 30 हजार मालमत्ताधारक आहेत. पालिकेचा सर्व आर्थिक कारभार याच मालमत्ता धारकांच्या खांद्यावर होता. ग्रामीण पनवेलसह खारघर, कळंबोली व कामोठे येथून मालमत्ताकराला विरोध वाढल्यानंतर पनवेल पालिका प्रशासनाने विकासकामे करण्यासाठी पालिकेच्या विविध बँकांमधील अनामत रक्कम मोडण्याचा मार्ग निवडून विकासकामे केली. त्यानंतर भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी नागरिकांमध्ये चळवळ उभी केल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनी सभागृहात मालमत्ता करवाढीचा मुद्दा लावून धरला. यामुळे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी तीच मागणी केल्यामुळे पालिका प्रशासनाने 30 टक्के दर कमी करीत नवीन धोरण जाहीर केले. खारघरमध्ये अनेकांची सुनावणी घेतल्यानंतर लगोलग पालिकेने मालमत्ताकराच्या थकीत वसुलीच्या देयक वाटपाची कामे हाती घेतली. कोरोनाकाळातील टाळेबंदी उठत असताना गेल्या आठवड्यापासून पालिकेने कामोठे व कळंबोली वसाहतींमध्ये जलद गतीने देयके वाटपाचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. तसेच ऑनलाइन भरणा केल्यास 5 टक्के सवलत जाहीर केली आहे. यानुसार आतापर्यंत 10 हजार मालमत्ताधारकांनी 20 कोटींचा ऑनलाइन भरणा केला आहे.

शेकाप महाविकास आघाडीच्या पालिकेतील सदस्य मात्र चार वर्षांचा थकीत मालमत्ताकर वसूल करू नये यावर ठाम आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ लवकरच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती विरोधी गटाचे पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिली.

ऑनलाइन भरणा केल्यास 5 टक्के सवलत
मालमत्ता कराबद्दल सर्व रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देयके वाटप सुरू आहे. नागरिक त्यांचा मालमत्ता नोंदणी क्रमांकावरून पालिकेच्या संकेतस्थळावर त्यांचे मालमत्ताकराचे देयक पाहू शकतील. संकेतस्थळावरून देयक पाहून त्याची रक्कम पालिकेकडे जमा केल्यास ऑनलाइन भरणा केल्यास 5 टक्के सवलत देण्यात येत आहे. पालिकेचे अनेक अधिकारी सिडको क्षेत्रात राहतात. त्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी ‘मी कर भरला, तुम्ही कधी भरणार’ अशी मोहीम समाजमाध्यमांवर राबविली आहे.