पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

पनवेलमधील दुकानांना दुपारी 04 वाजेपर्यंत परवानगी

पनवेल : अत्यावश्यक सेवेसह इतर सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना पनवेलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून अंशतः अनलॉकिंगच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी पनवेलमधील बाजारपेठा, टपाल नाका, उरण नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी नागरिकांची तुडुंब गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नावाने अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

पनवेल पालिका तिसर्‍या टप्प्यात असली तरी येथील सध्याची लोकसंख्या दहा लाखांवर असल्याने टाळेबंदीच्या खुल्या धोरणातील चौथ्या टप्प्यातील सर्व नियम पनवेल पालिकेला लागू झाल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. पनवेलमधील मॉल्स, सिनेमागृह आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपाहारगृह 50 टक्के क्षमतेने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर पार्सलसेवा नियमित सुरू राहणार आहे. अत्यावश्यक कर्मचार्‍यांनाच रेल्वेप्रवास सुरू ठेवल्याने बसथांब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मैदानी खेळासाठी आठवडाभराची मुभा पनवेल पालिकेने दिली असून सकाळी सात ते नऊ त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच्या वेळेत नागरिक मैदानात खेळू शकतील. तसेच व्यायामशाळा, सलून,  ब्युटी पार्लर, स्पा 50% मर्यादेसह उघडण्यास मुभा असेल परंतु या आस्थापनात वातानुकूलित यंत्रणा चालू ठेवता येणार नाही. याशिवाय लग्नसमारंभाठी 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकत्र जमू शकणार नाहीत. तसेच पाच वाजल्यानंतर एका व्यक्तीसही विनाकारण बाहेर फिरल्यास फौजदारी कार्यवाहीची अट पनवेल पालिका क्षेत्रात अमलात आणली आहे. 

सोमवारी सकाळी 07 वाजल्यापासून ते दुपारी 04 वाजेपर्यंत किराणा मालाची दुकाने, चिकन-मटण मासळी बाजार, भाजी मंडई, कपड्यांची दुकाने, मोबाईल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुकाने, हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने यासारखी विविध दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी प्रतीक्षेत असणार्‍या नागरिकांनी सकाळपासूनच पनवेल शहरातील विविध ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. कोरोनाचे कोणतेही भय न बाळगता काही बेशिस्त नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः विसर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यातच अनेक ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानांसमोर वाहनांच्या लांबलचक रांगा लावल्या होत्या. त्यामुळे त्यातून वाट काढताना नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. सोमवारी दिवसभर पनवेल शहरात नागरिकांची वर्दळ असल्याने तसेच काही बेशिस्त नागरिकांनी भर रस्त्यावरच बेकायदेशीर वाहनांची पार्किंग केल्यामुळे शहरातील उरण नाका, टपाल नाका, एमटीएनएल मार्ग आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.