मानवी साखळी आंदोलनाला सुरुवात

नवी मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज 10 जून रोजी प्रकल्पग्रस्तांचे मानवी साखळी आंदोलन सुरु झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार्‍या एकूण 200 किलोमीटर लांबीच्या या साखळीतील नवी मुंबईतील ठाणे बेलापुर मार्गावरील 21 कीलोमीटरचा टप्पा सर्वात लांब मानवी साखळीचा टप्पा असणार आहे. सकाळपासूनच नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे परिसरातील प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्र, शेतकरी या मानवी साखळीत सहभागी होवू लागले आहेत. 

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन आता राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्यानं सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे. त्याधर्तीवर आज समस्त भूमीपुत्रांद्वारे नवी मुंबई, ठाणे, रायगड ,पालघर ,कल्याण, मुंबई, मुरबाड,डोंबिवली,अंबरनाथ, अलिबाग,पेण, श्रीवर्धन,भिवंडी तसेच ज्या ज्या ठिकाणी आगरी कोळी, कराडी समाज राहत आहे त्यात्या ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात शासनाला इशारा देण्यासाठी 200 कीलोमीटरची मानवी साखळी तयार करून आंदोलन सुरु झाले आहे. तालुका स्तरावर टप्प्या टप्प्यात ही मानवी साखळी कोविड नियम पाळून तयार केली जात आहे.