गॅसवरील शवदाहिनीची मागणी

माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांचा पर्यावरणस्नेही उपक्रम

नवी मुंबई ः तुर्भे येथील स्मशानभुमी जिर्ण अवस्थेत असून तिचे नुतनीकरण करावे त्याचबरोबर गॅसवरील शवदाहिनी उभारण्याची मागणी माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. पर्यावरणस्नेही उपक्रमाचे आयुक्तांनी स्वागत केले असून संबंधित कामाला तत्काळ मान्यता दिली आहे. 

तुर्भे येथील स्मशानभुमीचे नुतनीकरण व्हावे म्हणून नगरसेविका शुभांगी पाटील यांनी 2016 पासून पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला आहे. तुर्भे स्मशानभुमी ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून तेथे तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, तुर्भे गाव तसेच कोपरी व वाशी विभागातून मृतदेह अंतिमसंस्कारासाठी येत असतात. वाशी मध्यवर्ती रुग्णालयातील अनेक बेवारस मृतदेहांवर तेथे अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभुमीची डागडुजी करावी किंवा नव्याने संपुर्ण नुतनीकरण करावे अशी मागणी शुभांगी पाटील यांनी केली आहे. यामध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी बाके बसविणे, अंतिम संस्कारावेळी म्हणण्यात येणारे मंत्र सर्वांना ऐकू येण्यासाठी ध्वनीक्षेप बसवणे, मृतदेह जाळताना होणारे प्रदुषण रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेणे याबरोबर डिझेल शवदाहिनीसोबत गॅसवरील शवदाहिनी उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. आयुक्तांनी गॅसवरील शवदाहिनी उभारणीच्या कामास मान्यता दिल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे. नवी मुंबईत गॅसवर उभारली जाणारी ही पहिली पर्यावरणपुरक शवदाहिनी असल्याचे त्यांनी सांगत आयुक्तांना धन्यवाद दिले आहेत.