विद्युत सबस्टेशन रामभरोसे!

देखभाल-दुरुस्ती अभावी दुरवस्था; सुरक्षाही धोक्यात

नवी मुंबई :  वाशीमधील महावितरणच्या विद्युत सबस्टेशनची (डी.टी.सी सेंटर्स) देखभाली अभावी दूरवस्था झाली असून येथील सुरक्षाही रामभेरोसे आहे. अडगळीच्या खोलीसारखी अवस्था झालेल्या या सबस्टेशनच्या आवारात कचर्‍याचे साम्राज्य पसरले असून हे भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे. 

नवी मुंबई शहरात विद्युत पुरवठा सुरळित रहावा या दृष्टीने महावितरणने ठिकठिकाणी सबस्टेशन उभे केले आहेत. परंतू देखभाल व दुरूस्तीकडे महावितरणचे दुलर्क्ष झाल्याने या सबस्टेशनची दूरवस्था झाली आहे. या सबस्टेशनच्या भिंती जीर्ण झाल्या असून काही ठिकाणी त्यांचे प्लास्टर निखळले आहे. संरक्षण भिंती ढासळलेल्या आहेत. काही सबस्टेशनचे दरवाजे तुटलेले आहेत.  त्यामुळे गर्दुल्ले तसेच नशा करणार्‍यांचे हे अडड्े बनले आहेत. काही सबस्टेशनमध्ये भिकार्‍यांनी बस्तान मांडले आहे काही ठिकाणे ही भटक्या कुत्र्यांचे आश्र्रय स्थान बनली आहेत. या सर्व प्रकारांमुळे सबस्टेशनची सुरक्षाही धोक्यात आली आहे.  समाजकंटकांकडून या ठिकाणी घातपात घडवून आणण्याची तसेच अपघात झाल्यास जीवीतहाणी होण्याची शक्यता नागिरकांकडून वर्त जात आहे.  

सबस्टेशनच्या आवारात कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे.  साफसफाई अभावी या जागेला बकाल स्वरूप प्रात्प झाले आहे. शहरात स्वच्छतेबाबत नागिरकांमध्ये जनजागृती केली जात आहे. परंतू,  स्वच्छ नवी मुंबई  सुंदर नवी मुंबईचा नारा मिरवणार्या तसेच  स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नंबर पटकाविणार्या नवी मुंबई महानगरपालिकेचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्युत सबस्टेशनच्या झालेल्या दूरवस्थांकडे महावितरणने लवकरात लवकर लक्ष घालून या सबस्टेशनची दुरूस्ती करावी तसेच येथील आवारातील कचरा तसेच डेब्रिज हटवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.

दुरूस्तीची कामे सुरू आहेत. काही कामे निधी अभावी रखडली आहेत. लवकरच ती कामे पूर्ण केली जातील.- रविंद्र जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वाशी

सबस्टेशनच्या आतील भागातील साफसफाईची जबाबदारी महावितरणची आहे. आपण तसे त्यांना कळविले आहे, तरीसुद्धा त्यांच्या सहकार्याने सयुंक्तरित्या कचरा व डेब्रिज हटविले जाईल. - बाबासाहेब राजाळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पालिका

महावितरणे सबस्टेशनच्या संरक्षण भिंती लवकरात लवकर बांधाव्या. गर्दुल्ल्यांचा त्रास वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सबस्टेशनचे आवार तर कचरा, डेब्रिजचे आगार बनले आहे. वारंवार तोंडी मागणी करून सुद्धा काहीही कारवाई केली जात नाही. - सुरेश तुकाराम शिंदे, सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण कमिटी, महाराष्ट्र शासन