विष्णुदास भावे नाट्यगृहात वाजणार तिसरी घंटा

नवी मुंबई ः कोव्हीड-19 या आजाराच्या विषाणूमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाल्याने नाटयगृहे बंद करण्यात आली होती. अनलॉकच्या टप्प्यात नाटयगृहे 50% क्षमतेनुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार 50% क्षमतेनुसार नाटयगृह सुरु करण्यात येणार आहे. सदर नाट्यगृहे सुरू करीत असताना राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोव्हीड संबंधी नियमांची योग्य रीतीने अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील माहे एप्रिल ते जून 2021 च्या तिमाही तारखा वाटपाची जाहिरात 01 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून माहे एप्रिल ते जून 2021 कालावधीतील तिमाही तारखा वाटप करण्यात आले होते. माहे जूनमध्ये नाटयगृह सुरु करावयाचे असल्याने इतर संस्था इच्छुक असल्यास तारीख मिळण्यासाठी अर्ज करु शकतात. त्याचप्रमाणे माहे जुलै ते सप्टेंबर 2021 च्या तिमाही तारखा वाटपासाठी दि.01 एप्रिल 2021 रोजी वृत्तपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार माहे जुलै ते सप्टेंबर 2021 मधील तारखा वाटप करणे प्रस्तावित आहे. तरी माहे जुलै ते सप्टेंबर 2021 साठी तारीख मिळण्यासाठी इतर संस्था इच्छुक असल्यास त्यादेखील  विष्णुदास भावे नाटयगृहात अर्ज करु शकतात असे आवाहन करण्यात येत आहे.