नवी मुंबईत लस वाया जाण्याचे प्रमाण 1.27 टक्केच

नवी मुंबई ः 4 लाखाहून अधिक नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण होत असताना प्राप्त झालेल्या कोव्हीड लसींचे कमीत कमी डोस वाया जावेत याची काळजी घेण्यातही नवी मुंबई महानगरपालिका आघाडीवर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस शासनाकडून कोव्हीड लसींचे 3 लक्ष 79 हजार 600 इतके डोस प्राप्त झाले आहेत. त्यामधील 3 लक्ष 69 हजार 480 इतके डोस वापरण्यात आलेले असून हे डोस वापरताना डोस वाया जाणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. हे डोस 3 लक्ष 64 हजार 805 इतक्या लाभार्थ्यांना देण्यात आले त्यापैकी केवळ 4675 इतकेच डोस वाया गेले आहेत. म्हणजेच 1.27 टक्के इतकेच डोस वाया गेले आहेत. हे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत खूप कमी आहे.

शासनाकडून दिल्या जाणार्‍या कोव्हिड लसीच्या एका कुपीमध्ये 10 डोस असतात. कूपी उघडल्यानंतर 4 तासांच्या कालावधीत हे 10 डोस देणे अपेक्षित असते. त्यामुळे शासनाकडून डोस दिले जातानाच त्यामधील 10 टक्के डोस वाया जातील असे गृहित धरूनच डोस दिले जातात. म्हणजेच दिलेल्या 110 डोसपैकी 100 डोस दिले जाणार हे गृहित धरूनच डोस दिले जातात. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक लसीकरण केंद्रावर डोस बाबतचे योग्य नियोजन करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने लस वाया जाण्याचे हे प्रमाण केवळ 1.27 इतके कमी ठेवले आहे. त्यामुळे लसींच्या उपलब्धतेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आघाडी घेणारी नवी मुंबई महानगरपालिका लसीची बचत करण्यातही आघाडीवर आहे.