परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 16 जूनला पुन्हा विशेष लसीकरण

नवी मुंबई ः उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये 31 मे व 3 जून रोजी दोन वेळा विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. मागणीनुसार पुन्हा 16 जून रोजी माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दोन वेळा विशेष लसीकरण सत्र पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. याचा लाभ परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या 319 विद्यार्थ्यांनी घेतला होता. तरीही काही विद्यार्थ्यांकडून आणखी एकवार लसीकरण सत्र आयोजन करावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दिनांक 16 जून 2021 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे अशा 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले ख-20 किंवा ऊड -160 फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.

पनवेलमध्येही विशेष लसीकरण सत्र
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 गावदेवी पाडा, पनवेल याठिकाणी पनवेल महानगरपालिकने परदेशी शिक्षण, नोकरीकरीता, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांकरीता जाणार्‍या नागरिकांसाठी सोमवारी (दि. 14) पासून विशेष कोविड लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य अथवा विशेष सत्र आयोजन करण्यासंदर्भात नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मागणी केली होती. या सत्रांमध्ये पहिला डोस घेऊन 28 दिवस पुर्ण झालेल्या परदेशी जाणार्‍या नागरिकांना दुसर्‍या डोसचे लसीकरण केले जात आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे लसीकरण सुरू असणार आहे. लसीकरणासाठी येताना सोबत आधारकार्ड, पासपोर्ट, व्हिसा, परदेशात काम करीत असल्याचे प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता किंवा खेळाकरिता संबधित संस्थेचे ऑफर लेटर आणावे.