नैना प्रकल्पाच्या परियोजनांची जलद गतीने अंमलबजावणी

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळाभोवतालच्या 371 चौ.कि.मी. च्या प्रदेशात साकारण्यात येत असलेल्या, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने होत असून प्रकल्पाकरिता प्रस्तावित 11 नगर रचना योजनांपैकी क्र. 1 ते 3 या योजनांवर विविध स्तरांवर कार्यवाही सुरू आहे. तर योजना क्र. 4 ते 11 या जमीन मालकांच्या मागणीच्या प्राधान्याप्रमाणे राबविण्याकरिता संबंधित जमीन मालकांना संमतीपत्र सादर करण्याचे आवाहनही सिडकोकडून करण्यात आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाभोवतालच्या प्रदेशाची होणारी संभाव्य अनिर्बंध वाढ रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 175 गावांतील मिळून 371 चौ.कि.मी. क्षेत्राच्या प्रदेशात सिडकोतर्फे नैना  हे पर्यावरणपूरक विकासावर आधारित, निवासी, वाणिज्यिक, शैक्षणिक इ. सोयी सुविधांनी परिपूर्ण असे अत्याधुनिक व सुनियोजित शहर विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता सिडको मध्यस्थ/समन्वयक म्हणून भूमिका बजावित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगर रचना परियोजनांद्वारे शहरांचा विकास साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे, म्हणून अधिक जलद व प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता,  नैना प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 मधील अस्तित्वात असलेल्या नगर रचना परियोजनांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला व सदर प्रकल्पाकरिता परियोजना तयार करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून सिडकोला देण्यात आले. नैना प्रकल्पाच्या नगर रचना परियोजनांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जमीन संपादन न करता सहभागी तत्त्वावर भूखंडांचा विकास केला जाणार आहे. योजनेत सहभागी होणारे भूधारक विकासाकरिता समान जमिनीचे योगदान देणार आहेत. या योजनेतील जमीन मालकांना मूळ भूखंडाच्या 40 टक्के भूखंड हा विकासयोग्य नियमित आकाराचा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार या भूखंडाकरिता मूळ जमिनीएवढाच चटई क्षेत्र निर्देशांक लागू असणार आहे. उर्वरित 60% जमिनीवर सिडकोकडून रस्ते, खेळाचे मैदान, बगिचा, शाळा, ग्रोथ सेंटर इ. भौतिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. जमीन मालकाची जमीन कुठल्याही आरक्षणाने बाधित होणार असली तरी त्यांना 40% भूखंड मिळणार आहे. 

सिडकोकडून नैना प्रकल्पाच्या अंतरिम विकास आराखड्यातील 23 गावांकरिता 11 परियोजना राबविण्यात येणार असून त्यांपैकी 1 ते 3 योजना मंजूर झाल्या असून त्यांवर विविध स्तरावर कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र शासनाकडून नगर रचना परियोजना क्र. 1 ला प्राथमिक स्वरूपात मंजुरी देण्यात आली आहे. नगर रचना परियोजना क्र. 4 ते 11 या जमीन मालकांच्या मागणीच्या प्राधान्याप्रमाणे हाती घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या योजनांची अंमलबजावणी व त्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास शीघ्र गतीने व्हावा, याकरिता संबंधित जमीन मालकांनी लवकरात लवकर आपले संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. 

नैना नगर रचना परियोजनांची अंमलबजावणी जलद गतीने व अत्यंत पारदर्शकरीत्या व्हावी यावर सिडकोचा कटाक्ष आहे. जमीन मालकांच्या सहभागातून व सहाकार्यातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प नगर विकास क्षेत्रातील एक आगळावेगळा प्रकल्प ठरणार आहे. - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको