विशेष लसीकरण सत्राचा 27 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

नवी मुंबई ः कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज तिसर्‍यांदा आयोजित करण्यात आलेल्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ 27 विद्यार्थ्यांनी घेतला. यापूर्वी दोन वेळा आयोजित सत्रात 31 मे रोजी 252 व 3 जून रोजी 67 अशा 319 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले होती.

पहिल्या 2 दिवशी आयोजित लसीकरण सत्राला काही कारणामुळे उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांकडून आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे आणखी एक सत्र आयोजित करण्याची विनंती केली जात होती. त्यानुसार या विशेष लसीकरण सत्राचे नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ 27 उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी घेतला.

पहिल्याच दिवशी 561 नागरिकांचे लसीकरण
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 22 शाळांमध्ये गुरुवारपासून नवीन लसीकरण केंद्रे कार्यान्वित झाली असून आज पहिल्याच दिवशी या 22 लसीकरण केंद्रांवर 45 वर्षावरील 561 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. आधीच्या 34 लसीकरण केंद्रांमध्ये 22 नवीन केंद्रांची वाढही करण्यात आलेली आहे. तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार आणखी लसीकरण केंद्रांचे वाढ करण्याचे नियोजन आहे.