186 दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण

नवी मुंबई ः 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना रांग न लावता लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरिता कोव्हीड लसीकरणाचे विशेष सत्र 17 जून रोजी 3 रूग्णालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. याचा 186 जणांनी लाभ घेतला. 

तथापि साधारणत: ऑगस्ट महिन्यात कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना त्यापूर्वीच दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण केले जावे या भूमिकेतून महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरिता कोव्हीड लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. अशाप्रकारे 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरीता विशेष लसीकरण सत्र आयोजित करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका आहे.

लसीकरणाच्या तिन्ही केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींचा उत्तम प्रतिसाद लाभला. सकाळी 9 ते 5 या वेळेत आयोजित या सत्रांमध्ये बाहेर तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी पडत असूनही सकाळपासूनच दिव्यांग व्यक्तींनी तिन्ही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रांवर उत्साही उपस्थिती दर्शविली होती. काही दिव्यांग पालकांसह अथवा मदतनीसासह येत होते तर काही दिव्यांगाना महानगरपालिकेचे रूग्णालयातील कर्मचारी मदतीचा हात देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

दिवसभरात महापालिका क्षेत्रातील तीन केंद्रांवर 18 वर्षावरील एकूण 186 दिव्यांग व्यक्तींनी लसीकरणाचा पहिला डोस घेऊन समाधान व्यक्त केले. यामध्ये माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरुळ येथे 64, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली येथे 58 आणि इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर 5 वाशी येथे 64 दिव्यांग व्यक्तींनी कोव्हीड लस घेतली. 45 वर्षावरील काही दिव्यांगांनी कोव्हीड लसीच्या दुसरा डोस घेतला.