एसआयईएस कॉलेजचा ऑनलाईन सिझन्स 2021 उत्साहात

नवी मुंबई ः कोरोना महामारीच्या पार्श्‍वभुमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शिक्षणाबरोबरच वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही ऑनलाईन आयोजन करुन ते यशस्वी करण्यात एसआयईएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. सिझन्स 2021 हा वार्षिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. 

दरवर्षी एसआयईएस कॉलेजतर्फे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सिझन्सचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सिझन्स 2021 या वार्षिक कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने 2 दिवस आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 40 हून अधिक मनोरंजक कार्यक्रम संपन्न झाले. सहभागी टिमने या महामारीमध्ये खरोखरच परिश्रम घेतले आणि एकमेकांच्या सहकार्याने नवी मुंबईतील सर्वात मोठा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात यशस्वी केला. इतर महाविद्यालयेही यात सहभागी झाली होती. पहिल्याच दिवशी आयोजित फॅशन शो मध्ये विशाल मल्होत्रा, सोनल अग्रवाल आणि अपूर्व भल्ला या परिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर विवेकसिंग यांच्या आयकॉनिक मैफिलीचे आयोजन केले होते. याचवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महान विनोदकार केनी सेबॅस्टियन देखील सहभागी झाले होते. दुसर्‍या दिवशी रॅप बॅटल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 11 वर्षापासून 24 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अनुप गायकवाड हे या कार्यक्रमाचे परिक्षक होते. मैफिलीसाठी दुसर्‍या दिवशी बायोशंक, द यलो डायरी आणि अनूव जैन असे नामांकित कलाकार मिळाले. कोरोना साथीच्या काळात झालेल्या या सिझन्स 2021 च्या कार्यक्रमामुळे सर्वांनाच एक सुखद क्षण अनुभवता आला. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.