सफाईमित्रांसाठीचा लोन मेळा उत्साहात

नवी मुंबई ः मॅनहोलपासून मशीनहोल पर्यंतच्या रूपांतरणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ मध्ये पालिका पहिल्या नंबरचा निश्चय करून सहभागी झालेली आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावीपणे काम केले जात असल्याचे सांगत उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आजचा लोन मेळा सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी उचललेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अ‍ॅम्फिथिएटरमध्ये आयोजित या लोन मेळ्यात स्वच्छताविषयक विविध उपकरणांचे, यंत्रसामुग्रीचे व वाहनांचे माहितीप्रद स्टॉल लावण्यात आले होते. तसेच अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देणार्‍या बँकांचे व आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य विम्याचेही स्टॉल प्रदर्शित करण्यात आले होते. या माध्यमातून सफाईमित्र स्वच्छताविषयक स्वत:ची यंत्रे घेऊन पूरक व्यवसाय करू शकतात, कंत्राटदार अधिक चांगली उपकरणे घेऊन कामात अद्ययावतता आणू शकतात तसेच याद्वारे आपल्याकडे काम करणार्‍या सफाईमित्रांचे आरोग्य जपू शकतात असे स्पष्ट करीत शासनामार्फत सफाईमित्रांना 20 टक्के सबसिडीही मिळेल, त्यामुळे या मेळाव्याचा लाभ घेऊन आपल्यातील सफाईमित्र लघुउद्योग करू शकले तर मेळाव्याचा उद्देश सर्वार्थाने सफल होईल असे आवाहन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी केले. सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी शासनाप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्याही विविध कल्याणकारी योजना असून त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन करीत उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे मानवी पध्दतीने सफाई करणे हा दंडनीय अपराध असून त्यासाठी रितसर गुन्हा नोंद होऊन 2 ते 5 लाखापर्यंतचा दंड व 2 ते 5 वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजची विविध माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. नाट्यसृष्टी कला संस्थेच्या कलावंतानी सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजचे उद्दिष्ट स्पष्ट करणारे पथनाट्य यावेळी सादर केले तसेच जनजागृतीपर व्हिडीओ क्लिप्सचेही प्रसारण करण्यात आले. याप्रसंगी सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजच्या माहितीप्रद टूल किटचे वितरण करण्यात आले. उपअभियंता वसंत पडघन यांनी प्रास्ताविकपर मनोगतात सुरक्षा चॅलेंजच्या अनुषंगाने महापालिका करीत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली तसेच उपअभियंता स्वप्निल देसाई यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महापालिका मुख्यालयाच्या आवारात सक्शन व जेटींग मशीन तसेच इतर वाहने व सुरक्षा साधनांचे प्रदर्शन करण्यात आले होते. या लोन मेळा निमित्त सफाईमित्रांनी व या कामाशी संबंधित कंत्राटदार, अभियंते, अभ्यागत यांनी विविध स्टॉल्सला भेटी देऊन माहिती जाणून घेतली तसेच अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सफाईमित्रांच्या सुरक्षेसोबतच सक्षमीकरणासाठीही नवी मुंबई महानगरपालिका पुढाकार घेऊन करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल सफाईमित्रांनी व संबंधित घटकांनी समाधान व्यक्त केले.