शौचालये स्वच्छतेसाठी 16 कोटींच्या कामाला मंजुरी

महासभेत मंजुरी : कंत्राटांच्या कालावधीविषयी विरोधकांचा आक्षेप

पनवेल : ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सर्वसाधारण सभेत पनवेल पालिकेने पुढील तीन वर्षे शौचालये स्वच्छ करण्यासाठी 16 कोटी 34 लाख रुपयांचा एकत्रित ठेका देण्याच्या कामाला सत्ताधारी भाजपकडून मंजुरी देण्यात आली. मात्र कंत्राटांच्या कालावधीविषयी विरोधकांनी आक्षेप घेतला. यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देण्यास प्रशासन असफल ठरले.  

दोन हजार शौचालयांच्या स्वच्छता 3 वर्षांत दिवसातून दोन वेळा करण्याचा खर्च पालिकेने 16 कोटी 34 लाख रुपये असल्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. यावर विरोधी बाकांवरून ठेक्याच्या कालावधीची चर्चा झाली. तर पनवेल पालिकेच्या पहिल्या सभागृहाचा कालावधी पुढील वर्षी संपणार आहे, अशा सभागृहातील सदस्यांकडून पुढील अतिरिक्त दोन वर्षांच्या ठेक्यांना का मंजुरी करून घेतली जातेय याविषयी शेकापच्या नगरसेवकांनी लक्ष वेधले. पालिकेच्या अधिकार्‍यांनी वर्षभराचाच ठेका दिला जातो, मात्र संबंधित ठेकेदाराची सेवा पाहून नंतर त्यास कालावधीची वाढ दिली जात असल्याची सबब पालिका अधिकार्‍यांनी दिली. मात्र सभागृहाची मंजुरी घेताना ती तीन वर्षांसाठी का घेतली जाते यावर कोणतेही ठोस उत्तर पालिका प्रशासन देऊ शकले नाही. तसेच सभागृहाचा कालावधी संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराने भविष्यात भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तत्कालीन सदस्यांना न्यायालयीन प्रक्रियेत पक्षकार म्हणून खेचू शकतो या कार्यवाहीकडे नगरसेवक कडू यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

पनवेल पालिका क्षेत्रात 263 सार्वजनिक शौचालयांमध्ये 1648 सीट्स आहेत. 18 मुतार्‍यांच्या 114 सीट्स आणि 21 फिरत्या शौचालयांमधील 210 सीट्स आहेत. या सर्व दोन हजार सीट्सची सफाईसाठी पालिकेने एका महिन्यासाठी एका वाहनाने 2 लाख 25 हजार रुपये खर्च यापूर्वी केला होता. आठ वाहनांसाठी महिन्याला पालिकेने 18 लाख रुपये खर्च केला आहे. पालिकेच्या स्थायी समिती सभापतींच्या सूचनेनुसार दिवसांतून दोन वेळा स्वच्छता करण्याचे आदेश आल्याने दरमहा 18 लाख रुपयांचा खर्च थेट महिन्याला 36 लाखांवर पोहोचला आहे. महागाईचा दर पालिका प्रशासनाने ध्यानात घेऊन यावर्षी 20 टक्के महागाई ध्यानात घेऊन दरमहा 43 लाख रुपये खर्चास आणि 3 वर्षांसाठी 16 कोटी 34 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्याचे महापौर कविता चौतमोल यांनी जाहीर केले.