कोरोनाबाधितांनी गिरवले योगाचे धडे

नवी मुंबई ः कोरोनाविरोधातील लढाईत शारीरिक व मानसिक बळ देणार्‍या योगासनांचा फार मोठा वाटा असल्याचे दिसून आले  आहे. देशातील सर्वोत्तम कोव्हीड सेंटरमध्ये गणल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी येथे सुरूवातीपासूनच योगासनांचा आधार घेतला जात आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोरोनाबाधितांनी योगाचे धडे गिरवत अत्यंत उत्साहाने आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.

यावर्षी ‘योग फॉर वेलनेस’ ही आंतराराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना जाहीर करण्यात आली असून शारीरिक व मानसिक कल्याणासाठी योगाभ्यास हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे. योगाचा रोगप्रतिकारशक्ती वाढीवर सकारात्मक परिणाम होत असल्याने सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दररोज सकाळी 1 तास योगक्रिया करून घेतल्या जात आहेत. एकही सुट्टी न घेता आठवड्याचे सातही दिवस हे योग वर्ग याठिकाणी राबविले जात असून दररोज 1 तासाच्या योग सत्रामध्ये सुरूवातीचा अर्धा तास योगासने व त्यानंतर 15 मिनिटे प्राणायाम आणि त्यानंतर 15 मिनिटे ध्यानधारणा करून घेतली जात आहे. कोव्हीडविरूध्द लढताना मनशक्ती हा एक महत्वाचा भाग असून योगासनांमधील प्राणायाममुळे श्वासाचे संतुलन तसेच शरीरासह मनाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढविण्यासही याचा उपयोग होतो. तसेच विविध साध्या सहज करता येणार्‍या योग प्रकारामुळे शरीराच्या हालचाली होऊन शरीर सुदृढ राखण्यास मदत होते. कोव्हीड सेंटरमधील या साध्यासोप्या योगासनांचा फायदा होत असून इथे दररोज सकाळी योगासने करण्याची लागलेली सवय येथून बरे होऊन घरी गेल्यानंतरही कायम रहात असल्याचे अभिप्राय अनेक कोरोनामुक्त नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. 

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे अनुभवी योग प्रशिक्षक प्रमोद कोकाणे हे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सिडको कोव्हीड सेंटरमधील कोरोनाबाधितांना योग प्रशिक्षण देत असून सोमवारी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी सुरूवातीला योगसाधनेचे महत्व विषद केले व सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा देत योग क्रिया करून घेतल्या.