कोपरखैरणेत नागरी सुविधांची वानवा

लवकरात लवकर सुधारणा करण्याची आपची पालिकेकडे मागणी

नवी मुंबई : कोपरखैरणे पसिरात  नागरी सुविधांची वानवा असून, अनेक गटारे, विद्युत डिपींची दुरावस्था झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे पालिका प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे का? असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. त्याचबरोबर पालिकेला विनंती अर्ज करुन लवकरात लवकर सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.  

कोपरखैरणे नोड मधील प्रभाग क्रमांक 45, 42, 35, 23 मधील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे का ? असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. या ठिकाणी गटार आणि इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन बोर्डसची भयानक वाईट अवस्था झाली आहे. उघडी गटारे, तुटलेली झाकणे, उघडया इलेक्ट्रिक केबल्स यांची दुरावस्था झाली आहे. तसेच बर्‍याच नाल्यांवर झाकण नाही. तर काही नाले हे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यात पावसाळ्यात कचरा अडकून राहतो. त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता असते. तसेच अशुद्ध पाणी भरल्यामुळे आजारही होतात. तसेच अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पार्टी कोपरखैरणे नोडचे वॉर्ड अध्यक्ष अभिषेक पांडे अध्यक्ष वॉर्ड 23, महादेव गायकवाड अध्यक्ष वॉर्ड 45, नीना जोहरी अध्यक्ष वॉर्ड 42, सुमती कोटियान अध्यक्ष वॉर्ड 38 यांनी याबाबतचा विनंती अर्ज पालिका प्रशासनाला केला आहे. या जर्जर रस्त्यांची, नाल्यांची, विद्युप डीपींची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबत प्रशासानाकडून त्वरित कारवाई करावी, यासाठी पाठपुरावा करीत आहेत.