विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असावे

राज ठाकरे यांनी मांडली भुमिका

मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरणावरुन वातावरण तापले आहे. राजकीय वर्तुळातही यामुळे मतभेद पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात येणारे विमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार आहे. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला असायला हवे, असे मत राज ठाकरे यांनी मांडले आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बां. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. कोणतेही विमानतळ जेव्हा येते, तेव्हा ते शहराच्या बाहेर येते. तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आले. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेले. त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असे नाव मिळाले. नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रस्ताव आला, तेव्हा मला आताचे विमानतळ देशांतर्गत आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार, अशी माहिती देण्यात आली होती. ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असले तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. हा महाराष्ट्र असून मुंबई राजधानी आहे. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमीत येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचे नाव असावे, असे मला वाटते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. हे काही सिडकोने मंजूर केले नि राज्याने प्रस्ताव केला, असे नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.

बाळासाहेब ठाकरे किंवा दि.बां. पाटील यांच्या मोठेपणाबद्दल दुमत नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत, या गोष्टीचे भान असायला हवे. जे नाव आहे ते कसे बदलणार? बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असायला हवे, असे सांगितले असते, असेही ते म्हणाले. जर महाराजांचे नाव विमानतळाला दिले जाणार असेल तर आमचा विरोध राहणार नाही, असा शब्द आ. प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.