लाचप्रकरणी ग्रामसेवकासह कर्मचार्‍याला अटक

पनवेल ः घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी 95 हजारांची लाच घेणार्‍या ग्रामसेवकासह एका कर्मचार्‍याला नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने अटक केली आहे. पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले आहे.

पनवेल तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतमधील एका घरमालकाला घरपट्टी आणि अ‍ॅसेसमेंटचे उतारे पाहीजे होते. यासाठी त्यांनी वडघर ग्रामपंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक दगडू देवरे यांच्याशी संपर्क केला असता त्याने 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. 95 हजारावर तडजोड झाली. ठरल्यानुसार सोमवार, 21 जुन रोजी दुपारी पनवेल एस.टी.स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर ब्रिजा गाडीमध्ये तक्रारदाराकडून 95 हजाराची लाच स्विकारताना देवरे आणि दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश डाकी या दोघांना अ‍ॅन्टी करप्शन पथकाने ताब्यात घेतले आहे.