सिटी सर्वेक्षणाला शासनाचा हिरवा कंदील

नवी मुंबई ः नवी मुंबईतील विस्तारित गांवठाणातील घरांचे थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरु करुन ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात यावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. दरम्यान, नगरविकास विभागानेही याबाबत हिरवा कंदील दिला असून लवकरच सिटी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून संकेत मिळाल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण करुन प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून सिटी सर्वेक्षणास शिदोरे अँड शिदोरे कंपनी वतीने बेलापूर गावातून सुरुवात करण्यात आली होती. अर्धेअधिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव सदरचे सर्वेक्षण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मे.टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंस अँड सर्व्हिस प्रोवायडर्स या एजन्सीमार्फत 7 मार्च 2020 पासून दिवाळे, सारसोळे आणि सानपाडा या गांवठाण क्षेत्रातून सिटी सर्वेक्षण सुरु करण्याचे जिल्हाधिकारी ठाणे यांनी आदेश देऊनही त्यास सुरुवात करण्यात आलेली नव्हती. त्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला असता कोरोना लॉकडाऊनमुळे सिटी सर्वेक्षणास सुरुवात होऊ शकली नव्हती. परंतु, सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असताना शासनाचे सर्व नियम पाळून सिटी सर्वेक्षण सुरु करण्यास हरकत नसल्याने पुढील कार्यवाही करता येईल, असे स्पष्ट केल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी दिली.