सिडको घेराव आंदोलनामुळे वाहतूकीत बदल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवार, 24 जून रोजी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या वाहतूक बदलासाठी सुचवलेले बरेच मार्ग खड्डेमय आणि अरुंद असल्यामुळे गुरुवारी अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव पारित झाला असला तरी भाजप, आरपीआय तसेच बहुतांश स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी विमानतळास दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी 24 जून रोजी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची तयारी पाहता मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सिडको कार्यालय परिसर 24 तारखेला सकाळी आठ ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता बंद केला आहे. जड व अवजड वाहनांना सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसेच शीव पनवेल आणि ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात पोलीस मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात असल्याने पोलीस बळ याच ठिकाणी एकवटले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस उपलब्ध होतील याची शाश्वती नाही.

वाहतुकीत कोणते बदल?
मुंबईहून येणारी वाहने ऐरोली मार्गे महापे पुढे शीळ फाटा व नंतर कळंबोली मार्गे पुढे जाणार आहेत. पनवेल मार्गे मुंबईला जाणार्‍या गाड्यांचा प्रवास मार्गही असाच असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान 7 ते 8 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे. तसेच नवी मुंबईतून पनवेलला व पुढे पुण्याला जाण्यासाठी वाशी कोपरखैरणे महापे शीळ फाटा व कळंबोली सर्कल असा मार्ग असणार आहे. याही मार्गावरील प्रवास 3 ते 8 किलोमीटपर्यंत वाढणारा आहे.
अवजड वाहनांना ठाण्यात रोखणार
भिवंडी, गुजरात येथून हजारो अवजड वाहने नवी मुंबईतील उरण जेएनपीटीच्या दिशेने जात असतात. या आंदोलनामुळे शहरात अवजड वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात गुरुवारी सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी अवजड माल वाहतूकदारांना गुरुवारी विनाकारण रस्त्यावर वाहने न काढण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुजरात येथून ठाण्यात येणार्‍या अवजड वाहनांना गायमुख परिसरात रोखण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. तर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना कोपरी येथून जाता येणार आहे. त्यामुळे या भागात वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.