नामांतरासाठी 15 ऑगस्टचा अल्टिमेटम

16 ऑगस्टपासून विमानतळाचे बांधकाम बंद पाडण्याचा इशारा 

नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी चार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र सिडकोला घेराव घालण्यासाठी गुरुवारी रस्त्यावर उतरले. जोरदार शक्तीप्रदर्शन करत बेलापुरमध्ये एकवटलेल्या भुमीपुत्रांनी ‘जय दिबां’ असा एल्गार केला. नामकरणासाठी सरकारला 15 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये योग्य निर्णय न घेतल्यास 16 ऑगस्टपासून विमानतळाचे बांधकाम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र सहभागी झाले होते. पहाटेपासूनच भूमिपुत्र नवी मुंबईमध्ये एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे पोलिसांनी सकाळी आठपासून सायन-पनवेल महामार्ग व सिडको भवनकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. आंदोलकांना पामबीच रोडवर नवी मुंबई महापालिकेच्या जवळ एकत्र येऊन तेथेच शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पामबीच रोडवर जवळपास दोन किलोमीटर अंतरावर आंदोलकांच्या रांगा लागल्या होत्या. भूमिपुत्रांच्या त्यागावर नवी मुंबई उभी राहिली असून, येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी आंदोलकांनी केली. विमानतळाच्या ठिकाणची कामे बंद पाडली जातील व आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा सरकारला देण्यात आला. यावेळी कृती समितीच्या वतीने एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने सिडको भवनात जाऊन विमानतळाच्या नावाबाबत तसेच अन्य मागण्यांबाबतचे निवेदन सिडको अधिकार्‍यांना सादर केले. हा प्रकल्प केंद्र सरकारचा मानला जात आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. आंदोलनात माजी खा.रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, आ.मंदा म्हात्रे, आ. राजू पाटील, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, हुसेन दलवाई, माजी खा. संजीव नाईक, माजी आ.संदीप नाईक व कृती समितीचे पदाधिकारी सहभागी होते. 

 सायन - पनवेल महामार्ग सात तास बंद
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सायन-पनवेल महामार्ग सकाळी आठ वाजता बंद करण्यात आला होता. दुपारी सव्वातीन वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सात तास महामार्ग बंद होता. या दरम्यान वाहतूक शिळफाटा मार्गे वळविण्यात आली होती. शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने मुुंबईतून पनवेलला जाण्यासाठी व पनवेलवरून मुंबईत पोहोचण्यासाठी तीन ते साडेतीन तास वेळ लागत होता. 
आंदोलन शांततेत पण कोराना सुरक्षा नियमांची पायमल्ली
प्रकल्पग्रस्तांनी आयोजित केलेले आंदोलन गुरुवारी शांततेत पार पडले. मात्र सुमारे 30 हजारांचा जनसमुदाय एकवटल्यामुळे करोना संसर्गाचा धोका बळावला आहे. आंदोलनादरम्यान करोनाप्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. अनेक आंदोलक विनामुखपट्टी फिरताना दिसत होते. सभास्थळी व्यासपीठावरून वारंवार अंतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र, प्रत्यक्ष व्यासपीठावरच नेतेमंडळी विनामुखपट्टी आणि अंतर नियम न पाळता गोळा झाल्याचे दिसून आले.

बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस तैनात 
 आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून बुधवारी सायंकाळपासूनच नवी मुंबईत हजारो पोलीस तैनात करण्यात आले होते.  पोलीस महासंचालकांनी मुंबई महानगर क्षेत्रातील कुमक व राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या  पाठविल्या होत्या. सूमारे सात हजार पोलीस बंदोबस्तासाठी असल्याने नवी मुंबई विशेष करुन बेलापुरला छावणीचे स्वरुप आले होते. प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनाला घेराव घातल्यास सरकारची नामुष्की होईल, या विचाराने पोलीस आयुक्त बिपिन सिंह यांनी आंदोलकांना सिडको भवनापर्यंत पोहोचू न देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून चालून आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला पोलिसांनी सिडको भवनापासून दोन किमी अलीकडेच रोखून धरले.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी सिडकोला घेराव घालणार्‍या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यावे या समर्थनार्थ काल पालघर ते रायगड परिसरातील भूमिपुत्रांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक नवी मुंबई शहरात दाखल झाले होते. त्यामुळे या ठिकाणी विविध कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. 4 माजी खासदार, 2 माजी मंत्री, 7 आमदार, 2 माजी आमदार, नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर, पनवेल महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शिवाय त्यांच्या जवळपास 18 ते 20 समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. स्टेज वरील लोकप्रतिनिधी आणि 18 ते 20 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
कोणत्या कलमांर्तगत गुन्हे दाखल?
साथीरोग कायदा, सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण, जमावबंदी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, ध्वनिप्रदूषण, वनविभाग कायदा, कोविड 2020 कलम 11, मपोका 143, 341, 188, 269, 270, मपोका अधिनियम 1951 कलम 37, 13 135, 115, 117 या कायदाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.