एकनाथ शिंदेंमुळे नवी मुंबईत शिवसेना अडचणीत

महापालिका निवडणूकीत शिवसेनेला धडा शिकवण्याचा प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

नवी मुंबई : चारपाच महिन्यांवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आली असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर करून घेतला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असून स्थानिक प्रकल्पग्रतांनी विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. सरकारने माघार न घेतल्यास येत्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. शिंदेच्या आततायीपणामुळे शिवसेनेला नवी मुंबईत अडचणीत आणल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

नवी मुंबईत सिडको बांधत असलेल्या विमानतळाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून संपूर्ण समाज आग्रही आहे. त्यांची हि मागणी गेल्या आठ वर्षांपासून असून त्याबाबत त्यांनी राज्यसरकार आणि केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सिडकोने विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव पारित करून तो राज्य सरकारकडे पाठवला. सिडकोच्या या निर्णयानंतर स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला असून त्यांनी दिबांचे नाव विमानतळाला द्यावे म्हणून समाजमाध्यमांवर मोहीम चालवली. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत दोन वेळा बैठक घेतली, पण दिबांच्या नावाशिवाय इतर कोणत्याही नावाला सहमती दर्शविली नसल्याने त्यांच्या उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठका निष्फळ ठरल्या.

24 जूनला सिडकोला घेराव घालण्याच्या उद्देशाने प्रकल्पग्रस्तांनी मोठा मोर्चा काढला होता. हा मोर्चा असफल होण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी सर्वदूर बॅरिकेटिंग करून जागोजागी अडथळे निर्माण केले होते. परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी हजारोंच्या संख्येने या मोर्चात उपस्थिती दर्शविली व आपल्या दिबांच्या नावाबाबाबत असलेल्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचण्यास ते यशस्वी झाले आहेत. दरम्यान राज्यसरकाने आपली मागणी मान्य न केल्यास येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्णय स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. 

प्रकल्पग्रस्तांना चुचकारण्याचा प्रयत्न
  • गेली पाच वर्ष बंद असलेल्या 102 दगडखाणी सुरु करण्याचा निर्णय शिंदे यांनी जाहीर करून नामांतरामुळे नाराज झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 
  • या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये फूट पडेल अशी आशा निर्णय घेणार्‍यांना असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. नामांतराच्या पार्श्वभूमीवर दगडखाणी सुरु करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी काही पर्यावरणप्रेमींनी केल्याचे सूत्रांकडून कळत आहे.  
शिंदेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेत नाराजी
  • एकनाथ शिंदे यांच्या नामकरणाच्या आततायीपणामुळे शिवसेना अडचणीत आल्याची शिवसैनिकांची भावना 
  • निवडणूक तोंडावर असताना नको असलेला वाद शिंदेंनी उकरून काढल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांची नाराजी शिवसेनेला भोवणार असल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता 
  • या वादाने आता उग्र स्वरूप धारण केल्याने शिंदेंच्या भूमिकेबाबत शंका  
वेळीच चूक सूधारा
ज्या भूमीपुत्रांचा विषय घेऊन शिवसेना महाराष्ट्रात उभी राहिली त्याच भूमीपुत्रांच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. दिबां शिवाय कोणतेही नाव प्रकल्पग्रस्तांना मान्य नाही. ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई या चार जिल्हयांमध्ये सागरी आगरी- कोळी भूमीपुत्र असुन शिवसेनेचा भगवा त्यांनी खांद्यावर घेतला आहे. शिवसेेना ज्या खांदयांवर उभी आहे तिलाच धक्का लावण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या अतातायीपणामुळे झाला आहे. शिवसेनेने वेळीच आपली चूक सुधारावी आणि खांदे मजबूत करावे. आमची ही लढाई राजकीय नसून अस्मितेची आहे. - निलेश पाटील, अध्यक्ष, आगरीकोळी युथ फाउंडेशन