महाराष्ट्रात 3 कोटी लसीकरण पूर्ण

मुंबई ः कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. देशात तीन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस दिली होती. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणार्‍या आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्यानंतर, आज 3 कोटी लशींचे डोस पूर्ण झाले आहेत.

दरम्यान, गुरुवार 24 जूनपर्यंत झालेल्या लसीकरणात 2 कोटी 97 लाख 23 हजार 951 जणांचे लसीकरण झाल्याची माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर, आता महाराष्ट्राने 3 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.