नवी मुंबईत नवे निर्बंध लागू

नवी मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून (28 जून) नवी मुंबईत नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नवी मुंबईत स्टेज 3 नुसार नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. 

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याने शासनाने निर्बंध काहीप्रमाणात शिथील केले होते. मात्र आता डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने राज्यात तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू केल्यानंतर नवी मुंबईतही स्टेज 3 नूसार कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत सोमवारपासून (28 जून) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत लेखी आदेश जारी केले आहेत.

असे असतील निर्बंध 

  • सर्व प्रकारच्या खासगी अस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
  • अत्यावश्यक सेवा, कृषी विषयक सेवा दुकाने संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील, तर उर्वरीत सर्व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद असतील.
  • सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांच्या उपस्थितीला मंजूरी असेल.
  • शाळा महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • रेस्टॉरंट, उपहारगृह सोमवार ते शुक्रवारदरम्यान, सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल.
  • शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद असतील.
  • खासगी/शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीसह सुरु ठेवता येईल.