शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अ‍ॅॅड. मनोहर गायखे यांचे निधन

शिवसेनेचे संपर्क नेते, नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख आणि शिव सहकार सेनेचे सरचिटणीस अ‍ॅॅड.मनोहर गायखे यांचे वयाच्या 64 वर्षी सोमवारी हृदयविकारांच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. 

मनोहर गायखे यांनी शिवसेनेच्या लोकाधिकार सेनेतून आपल्या सामाजिक आणि राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली होती. शिरूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी सेनेचे काम पाहिले होते. सेनेच्या लोकाधिकार समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.सध्या त्यांच्याकडे नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांच्या निधनाने सेनेने एक अभ्यासु, उच्चशिक्षित संघटक गमावला असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मनोहर गायखे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असल्याने राजकारण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  हृदयविकारांच्या तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर सीबीडी येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी दुपारी अचानक प्रकृती खालावल्याने दुपारी दोनच्या सुमारास गायखे यांचे निधन झाले.