नवी मुंबई पालिका मुख्यालयाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव’ द्यावे

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी

नवी मुंबई ः सर्वगुणसंपन्न असलेल्या शुर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीला कळावा, महाराजांचा खडतर, संघर्षमय जीवनप्रवासाची सतत आठवण सर्वांना राहावी म्हणून अशा भव्य कामगिरी करणार्‍या राजाचे नाव नवी मुंबई महानगरपालिकेच्या भव्य मुख्यालयाला देण्याची मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद अध्यक्ष यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले असल्याचे आ. म्हात्रे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्‍चात स्वराजाच्या, जनतेच्या रक्षणासाठी संघर्ष करुन आपले बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, समाजकारण, राजकारण, अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणार्‍या अशा राजाची किर्ती जनसामान्यात रुजू व्हावी याकरिता नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला त्यांचे नावे देण्याची मागणी शिवप्रेमी, शंभूपेे्रमींसह आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याविषयी अनेक सामाजिक संस्थाशी विचारविनीमय केला असून सर्वांचा या नावाला पाठिंबा असल्याचे म्हात्रे यांनी संागितले. ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका’ असे नावे दिले तर येणार्‍या नव्या पिढीला संभाजी महाराजांविषयी जाणून घेण्याची ईच्छा तर होईलच शिवाय सर्व घटकांना त्यांचा इतिहास समजेल. तसेच यामुळे इतर महापालिकांसमोरही नवा पायंडा पडेल व समाजापुढेही नवा आदर्श उभा राहिल असेही त्यांनी सांगितले. या मागणी संदर्भातील पत्र नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर, राज्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद अध्यक्ष, विरोध पक्षनेते यांना दिल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या मागणीचा स्थानिक पातळीसह राज्य पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एपीएमसीचे संचालक शंकरशेठ पिंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉ.राजेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, गणेश पावगे उपास्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या या वास्तूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याकरिता अनेक संस्था, संघटना तसेच शिवप्रेमी, शंभुप्रेमींची मागणी होती. या लोकभावनेतून ही मागणी करण्यात आली असून राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका मुख्यालयांना नामकरण देण्याबाबतचा ठराव राज्यशासनाकडे गेलेले असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नामकरण बाबतचा ठराव अजून गेलेला नाही. एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून ही मागणी केली आहे. -आमदार मंदाताई म्हात्रे