गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली

सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती 2 फूट उंचीची मूर्ती

मुंबई : 10 सप्टेंबर 2021 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्री गणरायाच्या आगमनाच्या पुर्वतयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, या नव्या नियमावलीमुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील मूर्तीकारांनीही महाविकास राज्य सरकारकडे तातडीने गणेशोत्सवाबाबत धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली होती. कारण गणेशोत्सवाला अवघे दोन महिने उरलेले असताना मूर्तीकार चिंतेत आहेत. कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तींचे काम मूर्तीकारांनी सुरू केलेले नाही. यंदाच्या गणेशोत्सवदरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकारांच्या उत्साहावर पाणी पडेल, असे म्हटले जात आहे.

मार्गदर्शक सूचना

 • - कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
 • - सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना स्थानिक प्रशासनाकडून यशोचित परवानी घेणे आवश्य असेल.
 • - श्रीगणेशमूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती गणपतीकरिता 2 फूट असावी.
 • - गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
 • - शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी. आणि विसर्जन घरच्या घरी करावे.
 • - घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास कृत्रिम तलावात करावे.
 • - नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
 • - आरती, भजन, कीर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
 • - सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे राबवून जनजागृती करावी.
 • - गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
 • - ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंध कायम राहतील. गणेशोत्सवानिमित्त त्यात शिथीलता देता येणार नाही.
 • - श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
 • - विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
 • - लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.