240 कोटींच्या सिसिटीव्ही निविदेला जय महाराष्ट्र

आयुक्तांच्या दणक्याने नाथांचा ठेकेदार अनाथ

नवी मुंबई ः गेले काही महिने नवी मुंबईत गाजत असलेल्या सिसिटीव्ही कामाची निविदा पालिका आयुक्तांनी रद्द केली आहे. नवीन सल्लागाराने सादर केलेल्या अंदाजपत्रकाला नव्याने प्रशासकीय मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर अभियंता विभागाला दिले आहेत. पालिकेने नेमलेल्या तज्ञांच्या समितीच्या शिफारशीवरून हा निर्णय आयुक्तांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.

पालिकेने नवी मुंबईत सिसिटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया सुरुवातीपासून वादात सापडली होती. यापूर्वी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यतेवरून सदर निविदा सरकारने रद्द केली होती. आमदार गणेश नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांनीही निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करून सदर निविदा प्रक्रिया लोकप्रतिनिधींची निवड झाल्यावर राबवण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. सुतार यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार करून संबंधित निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

2019 मध्ये सर्वसाधारण सभेने 154 कोटींची प्रशासकीय मंजुरी या कामास दिली होती. पण या निविदेस 271 कोटीचा देकार आल्याने आयुक्तांनी या निविदेबाबत निर्णय घेण्यासाठी व्हीजेटीआय, आयटीआय आणि सि-डॅकच्या मधील तज्ज्ञांची समिती गठीत करून अहवाल मागवला होता. दरम्यान संबंधित ठेकेदाराने 240 कोटी रुपयांपेक्षा दर कमी करण्यास नकार दिला. त्याचबरोबर संबंधित तज्ञ समितीने निविदेच्या कोणत्याही तांत्रिकबाबीत छेडछाड केल्यास हि यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या उद्देशाला हरताळ फासेल असे सुचविल्याने अखेर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हि निविदा प्रक्रियाच रद्द केली असून हि निविदा नव्याने बनवण्यासाठी नवीन  सल्लागाराची नेमणूक केली आहे. नवीन  सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिकबाबी विचारात घेऊन नव्याने अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने पालिका अधिकार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान हि निविदा आपल्याच ठेकेदाराला मिळावी म्हणून प्रयत्नात असलेल्या नाथांच्या ठेकेदाराला आ. गणेश नाईकांनी आयुक्तांमार्फत एका झटक्यात अनाथ केल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात आहे.