दिव्यांगांच्या समस्या सोडवणार

अपंग क्रांती संघटना शिष्टमंडळाची तहसीलदारांबरोबर चर्चा             

पनवेल : अपंग क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका तहसीलदार विजय तळेकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन दिव्यांगांच्या विविध समस्या व सबंधीत शासकीय योजना याबाबत सविस्तर चर्चा केली. शासनाच्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्यात येईल, अंत्योदय रेशन धान्य योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र दिव्यांग कुटुंबांना लाभ मिळवून देण्यात येईल, तसेच ज्या दिव्यांग कुटुंबांत एक किंवा दोनच लाभार्थी असतील त्यांना शासकीय नियमानुसार अन्न सुरक्षायोजनेचा लाभ देण्याचे मान्य केले.

दिव्यांगांना उत्पन्नाचे दाखले देतांना सदर दाखले विनाविलंब व योग्य त्या प्रकारे देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच एकाच कुटुंबांत एका पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असल्यास प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पुर्ण लाभ मिळू शकतो. असे तहसीलदार तळेकर यानी स्पष्ट करून सांगितले. तसेच कार्यालयात दिव्यांगांच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन ही देण्यात आले. यापुर्वी तहसील कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करताना उंच पायर्‍यांमुळे दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक यांना चढ-उतार करणे कठीण जात होते. आता त्या पाय-या दिव्यांग व जेष्ठांनी चढण्यायोग्य सोयिस्कर बनविल्याबद्दल संघटनेतर्फे तहसीलदार याना धन्यवाद देण्यात आले. तसेच या मध्ये अजूनही सुधारणा करून कार्यालयाच्या आतिल बाजूने सोयिस्कर असा रॅम्प बनवून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. यावेळी कार्यालयातील इतर अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी विलास फडके रायगड जिल्हा अध्यक्ष, बाळाराम रोडपालकर जिल्हा उपाध्यक्ष, अतुल रायबोले पनवेल तालुका उपाध्यक्ष, नवीन पनवेल विभाग प्रमुख उज्ज्वला नलावडे, दत्तात्रेय पाटील, रामा धर्मा कलोते, रविंद्र राठोड यांनी सुध्दा या चर्चेत सहभाग घेतला होता.