ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित

960 एलपीएम क्षमतेचा प्रकल्प ; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई ः पहिल्या व दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची भासलेली कमतरता संभाव्य तिसर्‍या लाटेत भरुन काढण्यासाठी पालिकेने स्वतः ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच प्रकल्प सुरु करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यातील पहिला प्रकल्प पुर्ण झाला असून त्याचे लोकार्पण गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. वाशी येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 960 लीटर प्रती मिनिट क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि सर्व सहकार्‍यांचे शिंदे यांनी अभिनंदन केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथील कोव्हीड सेंटरमध्ये सीएसआर अंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त एचआरसीटी डायग्नोस्टिक स्कॅनींग मशीनचे लोकार्पण तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील 960 एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही उल्लेखनीय प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री महोदयांसमवेत ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, व सुजाता ढोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त कोव्हीड विरोधातील लढ्याच समर्पित भावनेने अथक सेवाकार्य करणार्‍या डॉक्टरांचा प्रतिकात्मक सन्मान म्हणून सिडको कोव्हीड सेंटरमधील डॉ. शिवानी मिश्रा यांना सन्मानीत करण्यात आले. काही रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनींग करण्यासाठी त्यांना वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात न्यावे लागत होते. यामध्ये काही रूग्णांची प्रकृती अधिक खालावत असल्याचे निदर्शनास येत होते. याकरिता सिडको एक्झिबिशन सेंटर येथेच एचआरसीटी स्कॅनींग मशीन कार्यान्वित करणेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात येत होते. यामध्ये ‘फ्रीडम फॉर यू फाऊंडेशन’ यांनी सहयोगाची भूमिका घेत डाऊ केमिकल्स, बीएएसएफ कंपनी, इवोनिक  इंडिया लि. तसेच क्रोडा इंडिया लि. या नामांकित उदयोग समुहांमार्फत सीएसआरचे नियोजन करुन त्या अंतर्गत महानगरपालिकेस एचआरसीटी स्कॅनींग मशीन प्रदान केली. या मशीनव्दारे प्रतिदिन अंदाजे 100 कोव्हीड बाधित रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनींग होईल. त्यामुळे कोव्हीड रुग्णांवर तत्परतेने उपचार करता येणार आहेत. या मशीनमध्ये आवश्यकतेनुसार लहान मुलांचेही एचआरसीटी स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खाजगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये प्रती स्कॅन रु. 4000 इतका अंदाजे खर्च येतो. पालिकेच्या वतीने कोव्हीड बाधित रुग्णांचे एआरसीटी स्कॅनींग विनामूल्य केले जाणार आहे. याकरीता साधारणत: रु. 1 कोटी 85 लक्ष रकमेचा सीएसआर उपलब्ध झाला असून याची क्षमता 32 स्लाईस इतकी आहे. 

तिसर्‍या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने साधारणत: 1200 ऑक्सीजन बेड्स व 500 आय.सी.यू. बेड्सची वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामधील हा पहिला ऑक्सिजन प्रकल्प वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय येथे उभारण्यात आलेला आहे. प्रतिदिन 1.84 मेट्रिक टन इतकी या प्रकल्पाची ऑक्सिजन निर्मिती क्षमता असून दिवसाला 200 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर किंवा 10 डयुरा ऑक्सीजन सिलेंडर भरता येतील असे नियोजन आहे. साधारणत: रू. 1 कोटी 50 लक्ष इतका या प्रकल्पाचा खर्च असून या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे वाशी सार्वजनिक रूग्णालयातील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम  होणार आहे. 

ऑक्सिजन प्लॅन्टचा खर्च अनावश्यक
 मोठ्या दिमाखात आपली पाठ थोपटून घेण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालय आणि सिडको प्रदर्शनी केंद्रात ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी केलेला खर्च अनाठायी असल्याचे बोलले जात आहे. या ऑक्सिजनची शुद्धता 93 टक्के असून त्याचा दाबही कमी असल्याने हा ऑक्सिजन आयसीयूमध्ये वापरला जात नाही. याचा उपयोग फक्त ओटू बेड वरील रुग्णांसाठी करता येऊ शकतो. हा प्लॅन्ट बसवण्याऐवजी आयसीयूला आवश्यक असलेला प्लॅन्ट जर पालिकेने बसवला असता तर त्याचा उपयोग कोव्हिड साथीनंतरही पालिका रुग्णालयांना करता येऊ शकला असता. आपदा मे अवसर ढूंडना यालाच म्हणतात अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.