संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत सक्रीय कुष्ठरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम या एकत्रितपणे राबविण्याच्या निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला आहे. या संयुक्त् मोहिमेत प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीत मोफत औषधोपचार देऊन विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. या रोगाबाबत समाजात असलेले गैरसमज जनजागृतीव्दारे कमी करता येऊ शकतात हे लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत् क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व अद्याप निदान न झालेल्या संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व क्ष-किरण तपासणी करुन निदान निश्चितीनंतर त्यांचेवर मोफत औषधोपचार सूरू करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कोव्हिड महामामारीमुळे उपचारासाठी न आलेल्या संशयित क्षयरुग्णांची निदान निश्चिती करणे हा या कार्यक्रमाचा भाग आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी, बांधकाम साईट्स, दगडखाणी इ. अतीजोखमीच्या भागात माहे जुलै 2021 ते ऑक्टोबर 2021 तसेच माहे डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत सर्वेक्षणाच्या दोन फेर्‍या तर कमी जोखमीच्या भागात माहे जुलै 2021 ते मार्च 2022 या कालावधीत सर्वेक्षणाची एक फेरी आयोजित करण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत 151 पथकांच्या माध्यमातून 4,72,911 लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी आशांमार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे.  कुष्ठरोगाच्या लक्षणांमध्ये त्वचेवर फिकट / लालसर बधीर चट्टा, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे अशा प्रकारची लक्षणे विचारुन तपासणी होणार आहे.