दहा महापालिकांना मिळणार दोन अतिरिक्त आयुक्त

नवी मुंबई ः वाढलेली लोकसंख्या व महापालिकांवरील वाढलेला कामाचा ताण त्यात कोरोनामुळे इतर प्रशासकीय बाबी हाताळणे यासाठी ड वर्गातील 10 महापालिकांमधील अतिरिक्त आयुक्तांच्या मंजूर अललेल्या एका पदाव्यतिरिक्त एक वाढीव पद निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.  त्यामुळे या महालापालिकांमध्ये आता दोन अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. यात पनवेल महापालिकेचाही समावेश आहे.  राज्यातील सर्व ड वर्ग महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचे पद निर्माण करण्यात आल्यानंतर हे पद केवळ प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पालिका प्रशासनावर कामाचा ताण वाढला असून अन्य प्रशासकीय बाबी हाताळण्यासाठी ड वर्ग महापालिकामधील अतिरिक्त आयुक्तांच्या एका मंजूर पदाव्यतिरिक्त वाढीव एक पद निर्माण करण्याची आवश्यकता आहे. बुधवारी शासनाने याबाबत आदेश काढला. नव्याने निर्माण केलेल्या या पदांसाठी कोणताही निधी शासन देणर नाही. या पदासाठीचा खर्च संबंधित महानगरपालिकेच्या निधीतून करण्यात येईल असे शासनाने आदेशात नमुद केले आहे. या ड वर्गातील महापालिकांमध्ये मिरा-भाईंदर, भिंवडी, पनवेल, उल्हासनगर, सोलापुर, अमरावती, नांदेड वाघाळा, कोल्हापुर, सांगली मिरज, अकोला या महानगरपालिकांचा समावेश आहे.