पालिका निवडणुकीपासून एकनाथ शिंदे दूर राहणार?

नामांतरवादामुळे झालेली कोंडी फोडण्याचा सेनेचा प्रयत्न

नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या भुमिकेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या नाराजीचा फटका होवू घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नामांतराबाबत झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी शिंदे यांच्याविरुद्ध उघड नाराजी व्यक्त केली होती. ही कोंडी फोडून प्रकल्पग्रस्तांना चुचकारण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाच या निवडणुकीपासून दूर ठेवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून प्रकल्पग्रस्त गेली 8 वर्षे प्रयत्नांत असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सूचवून प्रकल्पग्रस्तांची नाराजी ओढावून घेतली आहे. याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असून नामांतराविरोधात नवी मुंबईतील झाडून सारे भाजपचे नेते आंदोलनात उतरले आहेत. प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत नामांतराचा वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत सर्वच नेत्यांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध नसून विमानतळाला मात्र दि.बा. पाटीलांचेच नाव देण्याची भुमिका घेतल्याने बैठकीतील चर्चा फिस्कटली. या बैठकीत प्रकल्पग्रस्त नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना प्रचंड विरोध केला होता. 

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईत स्थानिक प्रकल्पग्रस्तांची 29 गावे असून 16 जागांवर त्याचा प्रकल्पग्रस्तांशी थेट संबध आहे. याची जाणीव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना असून त्यांनी गेली पाच वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या बंद पडलेल्या दगडखाणी सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत 10 ते 15 नगरसेवक कमी निवडून आल्याने शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी लढणार असली तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मते यावेळीही निर्णायक ठरणार आहेत. प्रकल्पग्रस्तांची नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीपासून दूर ठेवून सारी जबाबदारी खासदार राजन विचारे यांच्याखांद्यावर द्यावी असा सूर सध्या शिवसेनेत आहे. पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याची संधी शिवसेनेला चालुन आली असून त्यामुळे पक्षप्रमुख प्रकल्पग्रस्तांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंबाबत कोणती भुमिका घेतात याकडे आता नवी मुंबईतील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

  • आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्यास सिडकोला शिंदेंनी आदेश दिल्याने प्रकल्पग्रस्तांची ओढावली नाराजी 
  •  नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत 16 ते 17 मतदार संघांवर 29 गावांतील प्रकल्पग्रस्तांचा प्रभाव असल्याने निवडणुकीपासून एकनाथ शिंदेंना दूर ठेवण्याची शिवसेनेकडून शक्यता