रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लरमधील व्यक्तींचे लसीकरण

नवी मुंबई ः मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनंतर शनिवारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्याकरिता सेक्टर 5 वाशी येथे ईएसआयएस रूग्णालय येथे तसेच विविध सलून, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर यामधील कर्मचार्‍यांकरिता सानपाडा सेक्टर 8 येथील केमिस्ट भवन मध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

ईएसआयएस रूग्णालय सेक्टर 5 वाशी येथील लसीकरण सत्राचा लाभ रेस्टॉरंटमध्ये काम करणार्‍या 200 कर्मचार्‍यांनी घेतला तसेच केमिस्ट भवन येथील लसीकरण ठिकाणी 92 पुरूष व 38 महिला अशा एकूण 130 सलून / ब्युटी पार्लर मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. ‘लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन्स फॉर सेफ महाराष्ट्र’ आदेशांतर्गत जारी करण्यात आलेल्या स्तरांनुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तर 3 मध्ये असून त्यानुसार शहरात दैनंदिन व्यवहारावरील निर्बंध लागू आहेत. यामध्ये रेस्टॉरंट व सलून / ब्युटी पार्लर हा एक महत्वाचा घटक असून याठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा इतरांशी निकटचा संपर्क येतो. त्यामुळे अशा संभाव्य जोखमीच्या कर्मचा-यांना कोव्हीड लसीचे संरक्षण मिळावे यादृष्टीने या कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे. कोव्हीड विरोधातील लढाईत अधिक लोकसंपर्कात येणारे सेवाकार्य करणार्‍या घटकांना कोव्हीड लसीव्दारे संरक्षित करणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्याकरिता हे विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यामधील उर्वरित घटकांकरिता आणखी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.