नवी मुंबईतही बनावट लसीकरण

कंपनीकडून 4 लाख उकळले ; दोघांवर गुन्हा दाखल 

नवी मुंबई : मुंबई पाठोपाठ नवी मुंबईतही बोगत लसीकरण झाल्याचे एका प्रकरणातून समोर आले आहे. मुंबईतील बोगस लसीकरणातील संबंधित आरोपींनीच शिरवणे एमआयडीसी येथील कंपनीत लसीकरण दरम्यान कामगारांना बनावट लस दिली आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट लसीकरण करून संबंधितांनी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले होते. 

शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले आहे. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती. केइसीपी हेल्थ केअर रुग्णालयाचे डॉ. मनीष त्रिपाठी, करीम आणि आणखी एक व्यक्ती यांनी संगनमताने प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी यांची नेमणूक न करता खोटे लसीकरण केले. 23 एप्रिलला हे शिबीर भरवले असता त्यावेळी कंपनीतल्या 350 कामगारांचे लसीकरण करून 4 लाख 24 हजार रुपये उकळण्यात आले होते. डॉक्टर प्रशिक्षित असल्याचे भासवून नानावटी रुग्णलयात वेगळ्या तारखांना ऑनलाईन माहिती भरून 2 जणांना प्रमाणपत्र देत ते खरे असल्याचे भासवले. उर्वरित 350 लोकांना प्रमाणपत्र न देऊन फसवणूक केली आहे. 

काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीतर्फे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्याआधारे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड, उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यामार्फत तपास सुरु होता. यामध्ये कंपनीच्या 352 कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार शुक्रवारी रात्री तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले की, या प्रकरणातील डॉ. मनीष त्रिपाठी हा आरोपी खरंच डॉक्टर आहे की नाही? याचीही चौकशी सुरु आहे. डॉ. त्रिपाठी याला अटक झाल्याने त्याच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीवर 7 गुन्हे या पूर्वीच दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांनी लस ऐवजी काय दिले? याचाही तपास सुरु आहे.