जेएनपीटीमध्ये माल हाताळणीत वाढ

जून महिन्यात 441,984 टीईयूची केली हाताळणी

मुंबई : लॉकडाउन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गति आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटी मध्ये जून 2020 च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78% अधिक आहे. रेल्वे ऑपरेशनच्या बाबतीत, जेएनपीटी मध्ये जून 2021 मध्ये 548 रॅकद्वारे 88,849 टीईयू आयसीडी वाहतूक हाताळणी झाली व बंदराच्या कामगिरीत रेल्वेचा वाटा 20.10% झाला.

वैद्यकीय उपकरणांची हाताळणी करून जेएनपीटीने कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यातही महत्वाची भूमिका पार पाडली. मागील महिन्यात जेएनपीटीने एमव्ही ह्युंदाई जहाजातुन आलेल्या एकूण 23.8 मेट्रिक टन वैद्यकीय उपकरणे असलेले दोन कंटेनर बंदरात उतरविले. जेएनपीटीच्या एपीएम टर्मिनलने एमव्ही ह्युंदाई हाँगकाँग या जहाजातुन आलेली कोविड-संबंधित औषधोपयोगी उपकरणे बंदरात उतरवली, तसेच एमव्ही मोल गारलँड या जहाजातील वैद्यकीय ऑक्सिजनचे दोन क्रायोजेनिक कंटेनर आणि एमव्ही ह्युंदाई प्लॅटिनम या जहाजातील वैद्यकीय उपकरणे असलेले चार कंटेनर बंदरात उतरविले. याव्यतिरिक्त, एमव्ही सीएमए सीजीएम रिगोलेटो जहाजातुन ही वैद्यकीय उपकरणे असलेले कंटेनर उतरविण्यात आले.

जेएनपीटीच्या या कामगिरीबद्दल बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, आम्हाला अभिमान आहे की जेएनपीटीच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली असून कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळातही बंदराची एकूण कंटेनर हाताळणी, कंटेनर वाहतुक आणि व्यवसायामध्ये वाढ होत आहे. आमचे प्रतिभावान आणि कुशल कामगार, सन्माननीय व मौल्यवान भागधारक यांनी यादरम्यान केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. आम्हाला सदैव सहकार्य करणार्‍या आमच्या व्यापार भागीदारांनी वैद्यकीय ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांची निरंतरपणे हाताळणी व पुरवठा करून देशाच्या आर्थिक विकासमध्ये व कोविड -19 विरुद्ध देशाच्या लढाईत एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून जेएनपीटीचे स्थान कायम ठेवण्यात मदत केली आहे.