कर्नाळा बँक ठेविदारांचे रास्ता रोको आंदोलन

कळंबोली ः कर्नाळा बँक घोटाळ्याने हजारो ठेवेदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. या ठेवीदारांनी मंगळवारी संघर्ष समितीच्यावतीने सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातून राज्य आणि केंद्र शासनाने धडा घेतला नाही तर मंत्रालय, आरबीआय बँकवर चाल करू, असा इशारा आंदोलनातून देण्यात आला.

कर्नाळा बँकेत 543 कोटींचा घोटाळा झाल्याचे रिझर्व्ह बँकेमुळे उघडकीस आले आहे. पनवेल संघर्ष समितीने व ठेविदारांनी सक्त संचनालयाकडून (ईडी) मुख्य आरोपी, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना अटक करायला लावली. गेल्या दिड वर्षात विविध स्तरावर पत्रव्यवहार, बैठका, ऑनलाईन मिटिंग घेवून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकार्‍यांनी ठेविदारांचा टोहो सरकारच्या कानात गुंजत ठेवला होता. आज रास्ता रोकोसाठी हजारो ठेविदार उत्स्फूर्तपणे कडू यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून बँक लुटारूंच्या नावाने शिमगा करत होते. महाडपासून खारघर आणि रसायनीपासून उरण, पनवेल कळंबोली, कामोठे, वहाळ, गणेशपूरी, ओवळे येथील ठेविदार लक्षणिय संख्येने उपस्थित होते. या आंदोलनातून राज्य आणि केंद्र शासनाने धडा घेतला नाही तर मंत्रालय, आरबीआय बँकवर चाल करू, असा इशारा देण्यात आला. ठेविदारांचे पैसे परत मिळाल्याशिवाय गप्प राहणार नाही अशी भुमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी कांतीलाल कडू, तेजस डाकी, रत्ना बडगुजर, प्रतिमा मुरबाडकर, विजय मेहता, उरणकर, मुणोथ, भूषण सांळुके, कृष्णा भगत, अनुराज पवार यांच्यासह अनेक ठेविदारांनी अंतःकणापासून भाषणातून व्यथा मांडल्या. कांतीलाल कडू यांनी आपल्या धारदार शैलीत मुख्य आरोपी विवेकानंद पाटील, राज्य शासन, केंद्र शासन, गृहखाते, सीआयडी, सहकार खात्याची लक्तरे वेशीवर टांगली. तसेच कर्नाळा बँक लढ्याला मिळत असलेले यश लाटू पाहणार्‍या आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यावरही आसूड ओढला. कळंबोली द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करीत असताना कांतीलाल कडू यांच्यासह सहकार्‍यांना पोलीसांनी अटक करुन त्यांची सूटका केली.