मालमत्ता करा विरोधात मूक प्रभात फेरी

पनवेल ः महापालिकेने लागू केलेल्या नव्या करप्रणालीला पनवेलकर जोरदार विरोध करत आहेत. तरीही नोटीसा पाठवून पालिकेने मालमत्ता कर आकारणी सुरु केली आहे. या मालमत्ता करा विरोधात बुधवारी मूक प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामोठे मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला संघटनांचे सभासद, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य इ. सुरक्षित अंतराचा पालन करून उपस्थित होते. 

महापालिका प्रशासनाने प्रस्तावित मालमत्ताकर धोरणात बदल करीत नवी करप्रणाली लागू केली आहे. 1 ऑक्टोबर 2016 मध्ये पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. जीआयएस सर्वेक्षणानुसार महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सिडको प्रशासित 2 लाख 50 हजार मालमत्ताधारकांना यापुर्वी 16 नोव्हेंबर 2019 ला आदेश पारित करुन नोड व झोननुसार मालमत्ता दर निश्‍चित करण्यात आले. यावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यावर यात बदल करुन नवीन आदेशानुसार वार्षिक भाडेमुल्यात 30 टक्के दर कमी कमी करीत नवीन धोरण जाहीर केले. महासभेत मंजूर ठरावानुसार हे दर जाहीर केले असले तरी प्रशासनाने सरसकट 2016 पासूनचा कर भरण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत. याला विरोधी पक्षासह सिडको वसाहतीमधील नागरिकांनी विरोध केला आहे. तीव्र विरोध असूनही पालिकेने नवीन करप्रणाली लागू केली आहे. त्यामुळे ही जुलमी मालमत्ता कर असल्याची चर्चा परिसरात आहे. पालिकेच्या या वसूली विरोधात बुधवारी मूक प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये कामोठे मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला संघटनांचे सभासद, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य इ. सुरक्षित अंतराचा पालन करून उपस्थित होते. तसेच आमदार बाळाराम पाटील साहेब, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेस नेते सुदाम पाटील, नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेविका लीना गरड, नगरसेवक प्रमोद भगत, राष्ट्रवादी नेते सूरदास गोवारी, शिवसेना नेते प्रभाकर गोवारी, शिवसेना नेत्या संगीता राऊत व इतर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी, विविध सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते. मूक प्रभात फेरी यशस्वी होण्यासाठी कामोठे येथील सामाजिक संघटनेचे अमोल शितोळे, मंगेश अढाव, रंजना सलोडिकर, राहुल बूधे, प्रवीण तावरे व सुरेश खरात यांनी विशेष मेहनत घेतली.

गेल्या तीन वर्षापासून आम्ही सातत्याने या जुलमी करप्रणालीला पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर जाहीरपणे विरोध करत आलेलो आहे. जो पर्यंत पालिकेच्या रहिवासियांची या जुलमी मालमत्ता करापासून सुटका होत नाही तो पर्यंत आमची ही लढाई अशीच चालू राहील व लवकरच समाधान न झाल्यास ही लढाई अधिक तीव्र होईल असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.