2 ऑगस्टला लोकशाही दिन

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु कोव्हिडमुळे या दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते. आता शासन परिपत्रकाद्वारे लोकशाही दिन आयोजित करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन 02 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे. 

कोव्हीड -19 संसर्ग पसरू नये म्हणून सुरक्षित अंतर नियमाचे पालन करण्याकरिता जनहितार्थ लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले नाही. तथापि शासनाने स्तरांनुसार नवीन प्रतिबंधात्मक नियमावली जारी केली असल्याने शासन परिपत्रकाद्वारे लोकशाही दिन आयोजित करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी परिषदेव्दारे करणे अथवा ज्या ठिकाणी कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच अर्जदारांना मर्यादित संख्येत समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार माहे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 02 ऑगस्ट 2021 रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये 16 जुलै 2021 पर्यंत आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे. लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते.