5 रेस्टॉरंट बारकडून अडीच लाख दंडवसूली

4 वाजल्यानंतरही दुकाने सुरु ठेवल्याने कारवाई ; 2 दुकाने सीलबंद

नवी मुंबई ः कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून तिसर्‍या स्तरामध्ये असणार्‍या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 विशेष दक्षता पथकांनी विशेष कारवाई करीत मागील 1 महिन्याच्या कालावधीत 3733 व्यक्ती / दुकानदार यांच्याकडून 16 लक्ष 77 हजार 400 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. नियम मोडून दुकाने सुरु ठेवल्याने 2 दुकाने सील केली असून तुर्भे आणि बेलापुरमधील 5 रेस्टॉरंट बारकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची दंडवसूली करण्यात आली आहे. 

कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या स्तर 3 मधील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार दुकाने / आस्थापना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि त्यानंतरही दुकाने, आस्थापना सुरु ठेवणार्‍यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. सदर नियमांचे पालन होत असल्याबाबत विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष देण्यात येत असून पहिल्या वेळेस रु.10 हजार दंड भरूनही पुन्हा दुसर्‍यांदा जाहीर वेळेनंतरही दुकान सुरु ठेवून नियमांचे उल्लंघन करणार्‍या सेक्टर 6 ऐरोली येथील गुरुकृप जनरल स्टोअर्स व यश सुपरमार्केट या 2 दुकानांवर सिलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तुर्भे जनता मार्केट येथे रात्री सुरु असणार्‍या रमेश रेस्टॉरंट व बार आणि द किंग बार या दोन आस्थापनांकडून प्रत्येकी रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच बेलापूर विभागातील विशेष दक्षता पथकांनी सेक्टर 15 येथील स्टार सिटी बार, आरूष रेस्टॉरंट व बार आणि सेक्टर 11 येथील मेघराज रेस्टॉरंट व बार या 3 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी रु.50 हजार इतका दंड वसूल केलेला आहे.

दोन वेळा दंड तर तिसर्‍यांदा सीलबंद कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने / आस्थापना 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल तसेच रेस्टॉरंट / बार / पब 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुसर्‍या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. तिसर्‍या वेळेस नियमांचे उल्लंघन केल्यास सदर आस्थापना कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद आहे.