14 दिवसाच्या आत कोविड भत्ता न दिल्यास काम बंद आंदोलन

मनसे कामगार सेनेचा पालिकेला इशारा 

नवी मुंबई ः पालिकेत सर्व विभागातील सूमारे 11 हजार कामगारांना 23 मार्च 2020 ते 31 मे 2020 या दरम्यानचा 300 रुपये प्रती दिन कोरोना भत्ता देण्याचे पालिकेने एप्रिलमध्ये जाहीर केले होते. मात्र अद्याप काही कामगारांना कोव्हिड भत्ता देण्यात आलेला नाही. यासंदर्भात 14 दिवसाचा कालावधी मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. 14 दिवसात जर कोव्हिड भत्तासह निवेदनातील इतर मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा मनसे कामगार सेनेने पालिका प्रशासनाला दिला आहे. 

मनपातील सर्व विभागातील सुमारे 7200 कंत्राटी कामगार, 2515 कायम कामगार 544 ठोक मानधनावरील कामगार व आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोरोना काळामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा भरती 741 असे एकूण 11 हजार कामगारांना 23 मार्च 2020 ते 31 मे 2020 या दरम्यानचा 300 रुपये प्रती दिन कोरोना भत्ता देणार असे परिपत्रक 27 एप्रिल 2021 रोजी काढूनसुद्धा काही कामगार वगळता इतर कामगारांना हा भत्ता अदयाप देण्यात आलेला नाही. त्यामुळे गुरुवारी  महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने मंजूर कोविड भत्ता तसेच मयत कामगारांचा 75 लाख इन्शुरन्स, घंटागाडी कामगरांचा 16 महिन्यातील फरक देण्यासाठी 14 दिवसाचा कालावधी मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. 14 दिवसाच्याआत वरील मागण्या मंजूर न झाल्यास नवी मुंबई मनपातील सर्व कामगार काम बंद आंदोलन करतील असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी कामगारसेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, युनियन अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, कोषध्यक्ष भूषण बारवे, उपाध्यक्ष रुपेश कदम, उपाध्यक्ष - रमेश पर्हाड,रणजीत सुतार, महेंद्र म्हात्रे, सुनील राठोड, विजय राठोड, अरविंद बोबले, देविदास भोईर, अशोक पाटील, सुयश पाटील  व कामगार पदाधिकारी उपस्थित होते.