आयुक्तांच्या ‘लाडा’ने विकास कामांचा ‘गाडा’

नवी मुंबई ः देशात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने रुग्णांना वेळीच उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य, अभियांत्रिकी आणि विद्युत विभागाने कंबर कसली आहे. त्यावेळी वाढत्या रुग्ण संख्येमुळे ठराविक वेळेत कोविड सेंटर उभारण्याचे आव्हान सर्वच विभागांवर होते. पण पालिका आयुक्त बांगर यांनी सर्वच विभागांवर दाखवलेल्या विश्वासाने आणि त्यांच्या पुरवलेल्या ‘लाडा’ने कोट्यवधी रुपयांचा कामाचा गाडा त्यांनी सहज पेलल्याने आणि रुग्णसंख्या आटोक्यात आणल्याने नवी मुंबईत आयुक्तांसह पालिकेचे कौतुक सर्वदूर होत आहे. 

देशात कोरोना संक्रमणाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट हि भयंकर असल्याचा अनुभव सर्वानीच घेतला आहे. अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. पहिल्या लाटेत नवी मुंबईत विलगीकरण कक्ष ठिकठिकाणी उघडण्यात आले होते. त्यामध्ये पनवेल येथील इंडियाबुल, वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र, तुर्भे येथील राधास्वामी सत्संग केंद्र, अनेक समाजमंदिर यासह 14 ठिकाणच्या कोविड सेंटर यांचा समावेश आहे. देशात पूर्ण लॉकडाऊन असताना मोठ्या प्रयासाने पालिकेच्या सर्वच विभागांनी कोट्यवधी रुपयांची कामे वेळेत पूर्णत्वास नेली. त्यामध्ये विद्युत विभागाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दोनच कार्यकारी अभियंत्यांनी अपूर्ण तांत्रिक मनुष्यबळ असतानाही हि जबाबदारी लीलया पार पडल्याने आयुक्तांनी त्यांचे भलतेच लाड केल्याची चर्चा आहे.

दुसर्‍या लाटेत कोरोनाच्या विषाणूने स्वरूप बदलल्याने झपाट्याने वाढणार्‍या रुग्ण संख्येला ऑक्सिजन आणि आयसीयु बेड्सची गरज मोठ्याप्रमाणावर भासली होती. शहराची ही पण गरज विद्युत विभागाने दिवसरात्र काम करून आणि अन्य विभागाशी ताळमेळ घालून पूर्ण केली. आयसीयु बेड्सला लागणार्‍या विद्युत पुरवठ्याची कामे खर्चाची तमा न बाळगता पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पालिका आयुक्तांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न पाहता फक्त रुग्णांच्या स्वास्थाचा विचार केल्याने हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी चालतील पण एकही रुग्ण दगावता कामा नये अशी भूमिका आयुक्तांनीच घेतल्यावर मग अधिकार्‍यांनी त्या संकल्पनेस अभिनव आकार दिल्याचे बोलले जाते. आयुक्तांनी पुरवलेल्या लाडाने आणि पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापेने श्रमपरिहार झालेल्या सर्वच विभागानी इंडिया बुल्स आणि अन्य कोविड सेंटर इथे पंखे लावणे, गिझर बसवणे, वातानूकुलीत लिफ्ट बसवणे हि कामे यथासांग पार पडली. याकामात त्यांना मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती करणार्‍या ठेकेदारांचीही मोलाची साथ लाभली आहे. हे सर्व पार पडत असताना पालिकेच्या बंद इमारतींची, बंद शाळांची, रुग्णालयांची आणि पथदिव्यांचीही देखभाल दुरुस्ती व्यवस्थीत करून वेळेत ठेकेदारांना देयकेही अदा केली आहेत. 

आता तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका सर्वत्र वर्तवला जात असल्याने व्यापक जनहितार्थ सर्वच विभाग पुन्हा सक्रिय झाले असून अनेक कोविड सेंटर मध्ये पुन्हा आयसीयु बेड्स तयार करण्यासाठी सरसावले आहेत. आयुक्तांनी खर्चाची चिंता न करण्याचे सूतोवाच सर्वच विभागाना दिल्याने सध्या कामाची अंदाजपत्रके बनवण्याची कामे प्रगती पथावर असून आपदा ला अवसर मध्ये कसे बदलावे याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याची चर्चा दबक्या आवाजात सध्या पालिकेत आहे. आता संक्रमणाच्या कितीही लाटा आल्यातरी त्याचा गाडा ओढण्याची ताकद पालिकेच्या सर्वच विभागांमध्ये असून आयुक्तांचा विश्वास आणि सर्वच विभागांचे पुरवलेले लाड त्याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 

आपदा मे अवसर
देशात कोरोना संक्रमण झाले आणि आपदा मे अवसर शोधण्याचा प्रयत्न सर्वच शासकीय यंत्रणांकडून झाला. नवी मुंबई महापालिकेतही कोट्यावधी रुपयांची औषधे खरेदी, रुग्णालयीन उपकरणे, कोव्हिड सेंटर उभारणे सारखी कामे करण्यात आली आहेत. तीसर्‍या लाटेच्या भितीपोटी अजून करोडो रुपये खर्च करण्याचा मानस पालिकेच्या सर्वच विभागांनी ठेवला आहे.