तौक्तेग्रस्तांना 1 कोटी 48 लाखांची मदत

पनवेल ः 17 मे 2021 रोजी ‘तोक्ते’ चक्रिवादळाचा तडाखा पनवेल तालुक्याला बसला होता. वेगवान वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या वादळामुळे पनवेल तालुक्यातील 1 हजार 668 आपदग्रस्तांच्या घरांची पडझड झालेली होती. घर पड-झड झालेल्या आपदग्रस्तांपैकी पात्र 1 हजार 518 आपदग्रस्तांना 1 कोटी 48 लाख 29 हजार 918 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यानी दिली आहे.

तोक्ते चक्रिवादळामुळे पनवेल तालुक्यातील अनेक भाग प्रभावित झाला होता. झाडे, घरे, पत्रे यांचे नुकसान झाले होते. येथील नुकसानीची पाहणी विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल यांनी केली होती. महाराष्ट्र शासन, शासन निर्णयानुसार 15% पडझड झाली असल्यास 15 हजार रूपये अथवा नुकसानीची रक्कम, जेथे किमान 25% पडझड झाली असल्यास 25 हजार रूपये अथवा नुकसानीची रक्कम जेथे किमान 50% पडझड झाली असल्यास 50 हजार रूपये अथवा नुकसानीची रक्कम यापैकी जी कमी असेल ती रक्कम मदत म्हणून प्रती घरे देणेबाबत शासन निर्णय झालेला आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील 1 हजार 598 पात्र घरांना शासन निर्णयाप्रमाणे 1 कोटी 48 लाख 29 हजार 918 चे देयके मंजूर झाली असून हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच 184 शेतकर्‍यांचे एकूण 26.67 हे.आर.क्षेत्राचे आंबा,भाजीपाला, केळी, शेवगा इ.चे पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना प्रती हेक्टरी रक्कम 50 हजार रूपये प्रमाणे नुकसानीच्या क्षेत्रानुसार एकूण रक्कम रुपये 12 लाख 68 हजार 300 रुपयांची मदत शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.