अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई

आयुक्तांची अधिकार्‍यांना तंबी ; भुमाफियांवरही कठोर कारवाईचे निर्देश

नवी मुंबई ः विनापरवानगी बांधण्यात येणार्‍या अनधिकृत बांधकामांमुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होते. माफिया वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. 22 जून रोजी घेतलेल्या अतिक्रमण विभागाच्या कार्यवाहीचा विभागनिहाय आढावा घेत आयुक्तांनी तक्रार आल्यावर कारवाई करण्याऐवजी विभागातील घडामोडींकडे जागरूकतेने लक्ष देत अशाप्रकारची अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे आढळल्यास धडक कारवाई करावी असे निर्देश दिले. तसचे याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. 

1 जून पासून 97 अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून नोटीशींना विहित कालावधीत प्रतिसाद न देणार्‍या 48 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. मागील बैठकीतील सादर केलेली अतिक्रमण विरोधी नोटीसा व कारवाईची आकडेवारी आणि त्यानंतरच्या कालावधीतील कारवाईची आकडेवारी यांचा विभागनिहाय तुलनात्मक आढावा घेताना नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी विभागीय क्षेत्रात अधिक जागरुकतेने सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभाग अधिकारी यांना दिले. अतिक्रमण विभागाच्या अभियंत्यांनी आपल्या क्षेत्रात फिरत राहून अनधिकृत बांधकामाबाबत दक्ष रहावे व नवीन अनधिकृत बांधकामे होणारच नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच होत असलेल्या बांधकामांना नोटीसा बजावून कायदेशीर कारवाई करावी असे आयुक्तांनी आदेशित केले.

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रत्येक विभागामाध्ये स्वतंत्र यंत्रणा असूनही अनधिकृत बांधकामे राजरोसपणे होत असल्याचे, एवढेच नव्हे तर काही ठिकाणी अनधिकृत पध्दतीने बहुमजली इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनधिकृत बांधकामांवर होणार्‍या कारवाईमध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचे नमूद करीत संपूर्ण यंत्रणेला गृहित धरून किंवा संबंधितांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जर अनधिकृत बांधकामे फोफावत असतील तर जबाबदारी निश्चित केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी जनजागृतीपर फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत व ते काढून टाकले जाणार नाहीत याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. सिडको व एमआयडीसीच्या जागांवरही अनधिकृत बांधकाम होऊ नये याबाबतही दक्ष राहण्याचे स्पष्ट करण्यात आले. अतिक्रमण विरोधी कारवाई सर्वांना समान न्याय या पध्दतीने व्हावी याचे भान ठेवून काम करावे व अशा बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळल्यास अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. रस्ते व पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी व रहदारीसाठी असून त्यावर कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणामुळे अडथळा चालणार नाही असे स्पष्ट करीत कोरोना प्रतिबंधात्मक आदेशानुसार सायंकाळी 4 नंतर दुकाने बंद होऊन सायंकाळी 5 पासून संचारबंदी लागू होत असल्याने फेरीवाल्यांनाही प्रतिबंध आहे याबाबत दक्ष राहण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली असून अतिधोकादायक इमारतींव्यतिरिक्तही इतर धोकादायक इमारतींबाबत दक्ष राहण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी यांना देण्यात आले.