कामोठेत घरफोडी

नवी मुंबई ः कामोठे सेक्टर-19 मधील शिवसागर सोसायटीत भरदिवसा घरफोडी करुन सुमारे पावणे चार लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार अजित कमलाकर हा कामोठे सेक्टर-19 मधील शिवसागर सोसायटीत पत्नी व मेव्हण्यासह राहण्यास आहे. अजित कमलाकर हा एमएमआरडीएमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणुन कामाला आहे. गत शनिवारी अजितला सुट्टी असल्याने अजित आपल्या पत्नीसह सासरी म्हसळा येथे गेला होता. मात्र त्याचा मेव्हणा प्रथमेश हा घरीच होता. शनिवारी सकाळी प्रथमेश घर बंद करुन आपल्या कामावर निघून गेला होता. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी अजितच्या घराचे टाळे तोडून त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास प्रथमेश घरी आल्यांनतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने घडल्या प्रकाराची माहिती मेव्हणे अजित याला दिली. त्यानंतर त्याने पत्नीसह कामोठे येथील घरी धाव घेतली. त्यानंतर त्याने सोमवारी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.