100 रुपयांत रुग्णवाहिका सेवा

नवी मुंबई : कोरोनाकाळात अनेकांनी संकटात चांगली संधी शोधून उद्योग व्यवसाय केल्याच्या अनेक कहाण्या ऐकविल्या जात असल्याने एका नवी मुंबईकराने मागील महिन्यात रुग्णवाहिका विकत घेतली आणि ही रुग्णवाहिका आज केवळ 100 रुपयांत सर्वांसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत या रुग्णवाहिकेचा सात रुग्णांसाठी उपयोग झाला आहे. महामुंबई क्षेत्रातील कोणत्याही रुग्णासाठी ही रुग्णवाहिका सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत उपलब्ध आहे. 100 रुपयांत ही रुग्णसेवा देणार्‍या नाव राघव नरसाळे  या नवी मुंबईकराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेली 18 वर्षे नवी मुंबईत राहणारे नरसाळे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. सध्या ते सानपाडा येथील सिडकोच्या मिलेनियम पार्कमध्ये राहात असून चार वर्षांपूर्वी घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका रुग्णालयात आईला दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने आणीबाणीचे कारण सांगून दोन हजार 200 रुपये घेतले. तेव्हापासून या रुग्णवाहिका चालकांच्या लूटमारीचा एक संताप मनात धगधगत होता. नरसाळे यांच्या मनात अत्यल्प दरात रुग्णवाहिका सेवा देण्याचा विचार घोळत होता. त्याला कोरोनासारख्या साथीच्या काळात मृतस्वरूप आले. नरसाळे यांनादेखील कोरोना झाला होता. त्यातून ते सुखरूप बरे झाल्यानंतर आपले मनोरथ पूर्ण करण्याचा चंग बांधला. एका क्षणात आपल्या बचतीचा 16 लाख 50 हजारांचा धनादेश टाटाला दिला. त्यांच्याकडून रुग्णवाहिकेसाठी आवश्यक असलेली टाटा विंगर ही टेम्पो प्रकारची रुग्णवाहिका विकत घेण्यात आली. या वाहनाची प्रादेशिक परिवहन विभागात तपासणी नरसाळे यांनी स्वत:हून करून घेतली. त्यावेळी तपासणी करणार्‍या निरीक्षकांनी देखील कोणत्या पक्षाचे आहात. काय करता अशी विचारणा केली, पण नरसाळे यांनी या सेवेचा हेतू सांगितल्यावर या परिवहन निरीक्षकांनी देखील नरसाळे यांना सहकार्य केले. 27 जूनपासून हीही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत आहे. आतापर्यंत सात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वेळ मिळाला की नरसाळे स्वत: रुग्णवाहिका साहाय्यकाचे काम करीत आहेत. रुग्णाला रुग्णवाहिकेत आणणे, त्यांच्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध करून देणे अशी कामे नरसाळे कोणतीही कुरबुर न करता करीत आहेत. माझ्या रुग्णवाहिकेचा वापर जास्तीत जास्त व्हावा असे मी म्हणणार नाही, पण ज्यावेळी ही सेवा लागेल तेव्हा मी उपलब्ध आहे, असे आश्वासन ते देतात. स्वत:च्या खिशातून चालकाचा पगारया रुग्णवाहिकेवरील चालकासाठी पदरचे 17 हजार पगार दिला जात आहे. महिन्याला एक डिझेल पेट्रोलमुळे 40 ते 50 हजार खर्च होणार आहे, पण खिशाला ही तोशीस स्वीकारून हे व्रत नरसाळे यांनी घेतले आहे.