पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझिटीव्हीटी दर 2.5 वर

पनवेल ः विविध उपाययोजना आणि निर्बंध याद्वारे पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिका कार्यक्षेत्रात पॉझिटीव्हीटी दरदेखील कमी होऊन 2.5 वर आला आहे. परंतु असे असले तरीही लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यापासून अनेकवेळा नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही अजून संपलेली नाही. मागील महिन्यात पॉझिटीव्ह येणार्‍या नागरिकांची संख्या कमी झाली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून या संख्येत कमी-अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. डेल्टा प्लस उत्परिर्वतित विषाणूचा धोकाही वाढला आहे. एकूणच सार्‍या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख वैद्यकीय आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानूसार गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रात केल्या जात आहेत. रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटीव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4 हजार आरटीपीसीआर आणि अँटीजन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला असून पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझिटीव्हीटी दर कमी होऊन हा दर 2.5 झाला आहे.